Video Song: चिमुकल्याचा आवाज ऐकून शंकर महादेवनही आवाक, भेटण्याची व्यक्त केली इच्छा
शंकर महादेवन यांनी एका लहान मुलाचा गातानाच व्हिडीओ शेअर केला आहे. एक दिवस त्याला भेटण्याची संधी नक्की मिळो, अशी इच्छा आहे, असंही महादेवन यांनी म्हटलं आहे.
मुंबई 21 फेब्रुवारी : आपल्या आवाजानं सगळ्यांनाच मंत्रमुग्ध करणारे संगीतकार आणि गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) यांनी नुकतीच एक इन्स्टाग्राम पोस्ट (Instagram Post) शेअर केली आहे. हा एका गाण्याचा व्हिडीओ आहे. मात्र, ते शंकर महादेवन नाही, तर एक लहान मुलगा गात आहे. या मुलाचा सुरेख आवाज ऐकून शंकर महादेवनही आवाक झाले. त्यांनी केवळ या मुलाचा व्हिडीओ शेअर केला नाही, तर याला सुंदर कॅप्शनही दिलं.
या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा एका मुलीला गाणं गायला शिकवत आहे. अत्यंत मनापासून तो तिला सूर शिकवत आहे. व्हिडीओ पाहाता तो सामान्य कुटुंबातला असून त्यानं कोणत्याही क्लासशिवाय गाणं शिकलं असल्याचं दिसत आहे. हाच व्हिडीओ शेअर करत महादेवन यांनी लिहिलं, की मी आतापर्यंत पाहिलेला सर्वात गोंडस आणि सर्वात भारी संगीताचा शिक्षक. त्याचा आवाज अगदी नैसर्गिक आहे आणि जन्मतःच त्याला हा आवाज गिफ्ट मिळाला आहे.
पुढे महादेवन यांनी त्याच्या गाणं शिकवण्याच्या पद्धतीचंही कौतुक केलं. संगीतकार म्हणाले, की गाणं शिकवताना त्याच्या चेहऱ्यावर असणारा आनंद आणि उत्साह पाहा. त्याचा हाच उत्साह पाहून समोर बसलेली चिमुरडीही गाणं शिकण्याचा प्रचंड आनंद घेत आहे. एक दिवस त्याला भेटण्याची संधी नक्की मिळो, अशी इच्छा आहे, असंही महादेवन यांनी म्हटलं आहे. अवघ्या एका तासात हा व्हिडीओ 40 हजाराहून अधिक लोकांनी पाहिला आहे. तर, अनेकांनी मुलाच्या आवाजाचं कौतुक केलं आहे. काहींनी तर हा मुलगा भविष्यातील शंकर महादेवन असल्याचं म्हणत त्याच्या या गाण्याला पसंती दर्शवली आहे.