मुंबई, 6 नोव्हेंबर- यश मिळवण्यासाठी प्रत्येकाला कष्ट हे करावेच लागतात. त्यात जर तुम्ही एखाद्या सामान्य कुटुंबातील असाल तर तुमचा स्ट्रगल (Struggle) जास्त मोठा असतो. बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) देखील 'किंग खान' होण्यासाठी खूप कष्ट केले आहेत. सध्या त्याच्याकडे असणारा पैसा आणि प्रसिद्धी सर्वांना आकर्षित करते मात्र, त्यामागे त्याने केलेले कष्ट अनेकांना माहिती नाहीत. दिल्लीतील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या शाहरुखनं अभिनेता होण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. 'फौजी' आणि 'सर्कस' सारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम करून आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या शाहरुखबद्दल आज तुम्हाला अशा काही गोष्टी सांगणार आहोत, ज्या तुम्ही आजपर्यंत कदाचित ऐकल्या नसतील. 'दीवाना' (Deewana) हा शाहरुखचा पहिला चित्रपट आहे, हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण, खरं पाहता त्याच्या पहिल्या चित्रपटाचं नाव 'दिल आशना है', असं आहे.
हेमा मालिनी यांचं दिग्दर्शन असलेला 'दिल आशना है' हा शाहरुख खानचा पहिला चित्रपट आहे. या चित्रपटाचं चित्रिकरण 'दीवाना'च्या अगोदर पूर्ण झालं होतं. मात्र, काही कारणांमुळं चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं. या दरम्यानच्या काळात दीवाना रिलीज झाला. 'दीवाना' रिलीज झाल्याच्या दोन आठवड्यांनंतर 'दिल आशना है' रिलीज झाला. याच कारणामुळं प्रत्यक्षात दुसरा चित्रपट असूनही 'दीवाना' हा शाहरुखचा पहिला चित्रपट म्हणून ओळखला जातो. योगायोगानं या दोन्ही चित्रपटात दिव्या भारती ही शाहरुखची सहकलाकार होती. दुर्दैवानं दिव्या भारती (Divya Bharti) आता हयात नाही.
'दीवाना'शी संबंधित शाहरुखच्या अनेक आठवणी आणि मनोरंजक किस्से जोडले गेलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या चित्रपटात शाहरुखच्या जागी अरमान कोहली दिसणार होता. त्यानं चित्रपटाचं शूटिंग देखील सुरू केलं होतं. परंतु, दिग्दर्शकाशी मतभेद झाल्यानंतर त्यानं हा चित्रपट सोडला. त्यानंतर अरमान कोहलीची जागा शाहरुखला मिळाली. मिळालेल्या संधीचं शाहरुखनं सोनं केलं आणि पडद्यावर आपली दीवानगी दाखवली. दीवाना रिलीज झाल्यानंतर शाहरुख खान आणि दिव्या भारतीच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं होतं.
'दीवाना' चित्रपटाचं शाहरुखच्या वैयक्तीक आयुष्यातदेखील खूप महत्त्व आहे. कारण, या चित्रपटाच्या यशावर त्याची 'लव्ह लाईफ' अवलंबून होती. हा चित्रपट जर यशस्वी झाला नसता तर शाहरुखला गौरीसोबत लग्न करता आलं नसतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, अभिनेता असलेल्या शाहरुखसोबत लग्न केल्यानं गौरीचं आयुष्य उद्ध्वस्त होईल, अशी भीती गौरीच्या कुटुंबीयांना वाटत होती. मात्र, शाहरुखनं गौरीला वचन दिलं होतं की, यश मिळवल्यावर तो तिच्या घरच्यांना लग्नासाठी तयार करेल. सुदैवानं 'दीवाना' जबरदस्त हिट झाला आणि शाहरुख-गौरीची प्रेमकहाणी यशस्वी झाली. चित्रपटाच्या यशानंतर शाहरुख लग्नासाठी गौरीच्या कुटुंबियांचं मन वळवण्यात यशस्वी झाला.
(हे वाचा: Sooryavanshi' मध्ये कतरिना-अक्षयसोबत फेमस झाला 10 वर्षाचा मुलगा; जाणून घ्या कोण)
शाहरुख खानच्या पहिल्या आणि दुसऱ्या चित्रपटांमध्ये दिव्या भारती ही अभिनेत्री होती. राज कंवर दिग्दर्शित 'दीवाना' या चित्रपटात ऋषी कपूर मुख्य अभिनेते होते तर शाहरुख सेकंड लीड होता. सेकंड लीड असूनही शाहरुखनं मोठ्या पडद्यावर चमत्कार केला. १९९२ मध्ये हा सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला होता. हा चित्रपट केवळ शाहरुख आणि दिव्यासाठीच नाही तर दिग्दर्शक राज कंवरसाठीही खास ठरला होता. 'दीवाना'नंतर दिग्दर्शक म्हणून राजची मागणी वाढली होती. दिव्या भारतीप्रमाणं राज यांचंही कमी वयातच निधन झालं.
स्पॉटबॉयच्या बातमीनुसार, हेमा मालिनी यांनी 'दिल आशना है'मध्ये शाहरुख खानला साइन करण्याबाबतचा किस्सा सांगितला होता. हेमामालिनी यांना एक नवोदित कलाकार म्हणून शाहरुख भेटला होता. त्यांनी त्याला अगदी स्पष्टपणे सांगितलं होतं की, दिल आशना है हा चित्रपट एका मुलीच्या आयुष्यावर केंद्रीत आहे आणि शाहरुखची भूमिका छोटी असेल. मात्र, शाहरुखनं अभिनेत्रीच्या प्रियकराची लहानशी भूमिकाही स्वीकारली होती.एकूणच दीवाना हा चित्रपट शाहरुखच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात फार महत्त्वाचा ठरला आहे. सर्वात खास म्हणजे त्या चित्रपटामुळं आज त्याची पत्नी गौरी त्याच्यासोबत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Shahrukh khan