मुंबई, 19 जानेवारी: गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर (Bollywood) राज्य करणारा अभिनेता शाहरुख खान (shahrukh khan) 2018 पासून मोठ्या पडद्यावरुन गायब आहे. शाहरुख खानचा 2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'झिरो' (zero) चित्रपटाला प्रेक्षकांचा फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. आता बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोणने (Deepika padukone) खुलासा केला आहे, बॉलीवूडच्या किंग खान 'पठाण' (Pathan) चित्रपटामधून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून चाहते या चित्रपटाची वाट पाहत होते.
अभिनेत्री दीपिका पादुकोणने नुकतीच एका मासिकाला मुलाखत दिली आहे. यावेळी तिने तिच्या आगामी चित्रपटाबद्दल बोलताना म्हणाली की, शाहरुख खान लवकरच 'पठाण' चित्रपटातून पुनरागमन करणार आहे. दीपिकानं यावेळी सांगितलं की, तिने नुकतंच शकुन बत्राच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू केलं आहे. या चित्रपटानंतर ती शाहरुख खानसोबत 'पठाण' चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. या चित्रपटात शाहरुख खानसोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण याव्यतिरिक्त डिंपल कपाडिया देखील दिसणार आहे.
यशराज प्रोडक्शनच्या बॅनरखाली निर्माण होणार्या ‘पठाण’ चित्रपटामध्ये सलमान खानदेखील कॅमिओ म्हणून दिसू शकतो. हा चित्रपट म्हणजे अॅक्शन ड्रामाचा मोठा धमाका असणार आहे. इतकंच नाही तर या चित्रपटाचं बजेटदेखील लवकरच बातम्यांच्या मथळ्यांत दिसायला सुरू होईल. कारण हा चित्रपट म्हणजे बॉलीवूडमधील सर्वात जास्त बजेट असणारा चित्रपट ठरणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, 'पठाण' चित्रपट 2021 सालच्या दिवाळीला प्रदर्शित होऊ शकतो.
शाहरुख खानचा चित्रपटांच्या प्रदर्शित करण्याच्या बाबतीत एक ट्रेंड आहे. शाहरुख वर्षातला सर्वात मोठा चित्रपट दिवाळीच्या मुहर्तावर प्रदर्शित करतो. त्यामुळे या वर्षीही पठाण चित्रपट दिवाळीत प्रदर्शित होईल, असं म्हटलं जात आहे. या चित्रपटा आधीही शाहरुख खान आणि दीपिका पादुकोण या जोडीने अनेक चित्रपट एकत्र केले आहेत. ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस आणि हॅपी न्यू इयर अशा चित्रपटांत ते दोघं एकत्र दिसले आहेत. त्यामुळे शाहरुख आणि दीपिकाच्या चाहत्यांना त्यांचे आवडते स्टार्स पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.