मुंबई, 11 मे : बॉलिवूड किंग अर्थात शाहरुख खान याच्या 2018 मध्ये रिलीज झालेल्या 'झीरो' सिनेमानंतर कोणताही सिनेमा रिलीज झालेला नाही. त्यामुळे त्याचे चाहते मागच्या बऱ्याच काळापासून त्याच्या आगामी सिनेमाची वाट पाहत आहेत. काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध दिग्दर्शक राजकुमार हिरानी यांच्या सिनेमात शाहरुख दिसणार असल्याचं बोललं जात होतं. शाहरुखनं ट्विटरवरही याबाबत हिंट दिली होती. पण आता राजकुमार हिरानी यांच्या सिनेमात दोन अभिनेते दिसणार आहेत आणि यासाठी ते सलमानचा विचार करत असल्याचंही बोललं जात आहे. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार शाहरुखला सलमानसोबत काम करायचं नाही आहे.
बॉलिवूड लाइफनं दिलेल्या वृत्तानुसार एका मासिकानं हा दावा केला आहे की, शाहरुखला या सिनेमात दोन नाही तर एकच हिरो असावा असं वाटतं. त्याचं याबाबत राजकुमार हिरानी यांच्याशी बोलणं सुद्धा झालं आहे. पण सूत्राच्या माहितीनुसार शाहरुखला सलमानसोबत काम करायचं नाही. त्यामुळे आता या दोघांच्याही चाहत्याचं या दोघांना एकत्र काम करताना पाहण्याचं स्वप्न आता अपूर्ण राहणार अशी चिन्ह आहेत. शाहरुखच्या झीरो सिनेमात सलमाननं एक गाणं केलं होतं. मात्र या व्यतिरिक्त दोघांनीही मागच्या बऱ्याच काळापासून एकाच सिनेमात काम केलेलं नाही.
कोरोना व्हायरस लॉकडाऊनमुळे शाहरुख आणि सलमान इतर सेलिब्रेटींप्रमाणे आपापल्या घरी आहेत. दरम्यान या कठीण काळात समाजसेवेसाठी दोघंही आपापल्या परिनं प्रयत्न करत आहेत. याशिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांना घरी राहून स्वतःची काळजी घेण्याचं काम ते करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Salman khan, Shahrukh khan