सुकन्याची 'माई' सांगतेय आपल्या लाडक्या लेकीबद्दल

सुकन्याची 'माई' सांगतेय आपल्या लाडक्या लेकीबद्दल

करारी, शिस्तप्रिय माई दिवसेंदिवस लोकप्रिय होतेय. 'घाडगे अँड सून'मधली सुकन्या कुलकर्णी-मोनेची माई याआधी 'जुळून येती रेशीमगाठी'मध्येही आपल्याला भेटलेली. पण दोन्ही माई तशा पूर्ण वेगळ्या आहेत.

  • Share this:

मुंबई, 12 आॅक्टोबर : करारी, शिस्तप्रिय माई दिवसेंदिवस लोकप्रिय होतेय. 'घाडगे अँड सून'मधली सुकन्या कुलकर्णी-मोनेची माई याआधी 'जुळून येती रेशीमगाठी'मध्येही आपल्याला भेटलेली. पण दोन्ही माई तशा पूर्ण वेगळ्या आहेत. शिवाय घाडगे माई तर आता बदलतेय. सुकन्यानं हा बदल कसा केला?

' पहिली माई मऊ स्वभावाची होती. मितभाषी, सगळ्यांना सांभाळून घेणारी होती. ही माईही सगळ्यांना सांभाळून घेणारी आहे. पण करारी आहे.' थोडे दिवस ही माई निगेटिव्ह वाटायला लागलेली. प्रेक्षकांना हे काही रुचेना. ' माझं हे रूप प्रेक्षकांच्या पचनी पडेना. त्यांना अशा निगेटिव्हिटीची माझ्याकडून अपेक्षाच नव्हती. म्हणून आम्ही बदल गेले. ' सुकन्या सांगते.

सुकन्याला तिच्या गेटअपमध्ये बदल करावा लागला. ' ही माई शिस्तप्रिय आहे. ते तिच्या पेहरावातूनही जाणावायला हवं. ती दागिन्यानं मढलेली नाहीय. पण मोजके दागिने, केस व्यवस्थित, साडीचा पदरही इस्त्री करून बसवलेला.' सुकन्या आपल्या व्यक्तिरेखेची खूप काळजी घेते.

ती सांगते, ' ही माई उथळ नाही. त्यामुळे ती चिडली तरी तिचा राग संयत दाखवावा लागतो. ती आब राखूनच बोलेल. इमोशनल होईल, पण दु:ख गिळून राहील. जो तिच्या व्यक्तिमत्त्वात ठहराव आहे तो तिच्या आवाजात असेल, डोळ्यांच्या भावात असेल. '

सध्या माईला कॅन्सर झालाय. पण तो पाॅझिटिव्ह दाखवलाय. सुकन्या म्हणते, ' आम्ही कॅन्सर पाॅझिटिव्ह दाखवलाय. त्याच्याकडे इतर आजारासारखं पहा. तो बरा होतो. एखाद्या झाडाला कीड लागते. तो भाग काढून टाकला जातो. कॅन्सरचंही तसंच आहे. तुमचं मनही मजबूत करावं लागतं आणि आम्ही या मालिकेत हेच दाखवतो.'

सुकन्याची प्रतिमा प्रेमळ कुटुंब प्रमुख अशी अनेकदा दिसते. तिला तशाच भूमिका मिळतात. तिला वेगळी भूमिका करावी वाटते का? यावर सुकन्या सांगते, ' नक्कीच, नेहमीपेक्षा वेगळी भूमिका कुणाला नाही आवडणार. मी एकदा अनामिका नावाची मालिका केलेली. त्यात मी डाॅक्टर होते आणि खूनही करते. पूर्ण नकारात्मक होती. पण आता मला सोज्वळ भूमिकाच मिळतात. मला निगेटिव्ह भूमिका करायला आवडेल.'

एवढ्या मालिका केल्यानंतर सुकन्याची आवडती मालिका म्हणजे आभाळमाया. आणि त्यापाठोपाठ 'जुळून येती रेशिमगाठी'

सुकन्या नक्की आहे कशी? ' मी प्रवाहाबरोबर जाणारी आहे. मी बंडखोर नाही. पण मला सतत काम करायला आवडतं. कुठलंही. अभिनयाप्रमाणे सामाजिक क्षेत्रातही काम करायला आवडेल.' सुकन्याचं आयुष्याचं ध्येयही मोठं आहे. ' मी नेहमी म्हणते आपल्यानंतर आपली आठवण काढली जाईल असं काही स्थान मला निर्माण करायचंय. त्यासाठी माझा संघर्ष सुरू आहे.' सुकन्याला मतिमंदांच्या शाळेसाठी काम करायचंय.

सुकन्या, तिचा पती संजय मोने आणि मुलगी ज्युलिया असं त्यांचं गोड कुटुंब. सुकन्या म्हणते, ' आम्ही तिघंही खूप वेगळे आहोत. ज्युलिया तर आजच्या पिढीतली. त्यामुळे तिचे विचार वेगळे असणारच. ती सर्वांना सामावून घेणारी आहे. पटकन माफ करते.' सुकन्या-संजय मोनेच्या मुलीला अभिनय नाही करायचंय. तिला अॅनिमल बिहेवियरमध्ये काही तरी करायचंय.

सुकन्याची मुलगी ज्युलिया वेगळी घडलीय. सुकन्या म्हणाली, ' ज्युलिया आठवीत होती. तेव्हा ती म्हणाली, माझा वाढदिवस मला जोरदार साजरा नाही करायचाय. तो मतिमंदांची शाळा आव्हान पालकसंघासोबत करायचाय. आणि तिनं तसाच केला.' सुकन्या म्हणते, त्या वयात मीही असा विचार केला नव्हता कधी.

सुकन्या आपला पतीही खूप वेगळा असल्याचं सांगते. ती म्हणाली, ' मी आणि संजय एकमेकांच्या आयुष्यात कधीच ढवळाढवळ करत नाही. संजयच्या विक्षिप्तपणावरच मी प्रेम केलंय.'

संजय आपल्याला खूप मदत करतो. अनेकदा घरी वाॅशिंग मशिनमधले कपडे वाळत घालण्यापासून, भांडी घासणं, स्वयंपाक करणं हेही तो करतो, असं सुकन्या सांगते. तिघंही जेव्हा एकत्र असतात तेव्हा हाॅटेलिंग करण्यापेक्षा घरीच स्वयंपाक करून एंजाॅय करण्याकडे त्यांचा भर असतो.

मालिकेत सुखी कुटुंबाचा आधारस्तंभ असलेली सुकन्या आपल्या खऱ्या आयुष्यातही अशीच आश्वासक वाटते.

श्रीदेवीच्या दोन्ही मुली झाल्यात फिटनेस कॉन्शस; पाहा जान्हवी आणि खुशीचे जिम लुक

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2018 02:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading