मुंबई, 20 नोव्हेंबर : छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांची सत्ता उलथवून लावत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. त्यांच्या या स्वराज्य स्थापनेमध्ये मावळ्यांनी जीवाची बाजी लावली. पुरंदरच्या तहात गमवावा लागलेला कोंढाणा किल्ला पुन्हा जिंकण्यासाठी तानाजी मालुसरेंनी प्राणांची आहुती दिली. मुलाचे लग्न असताना आधी लगीन कोंढाण्याचं अन मग माझ्या रायबाचं असं म्हणत ते मोहिमेवर गेले. याच तानाजी मालुसरेंच्या आधारीत TANHAJI हा हिंदी चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित होणार आहे. याचा ट्रेलर सोमवारी लाँच झाला.
दरम्यान, ट्रेलर लाँच झाल्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका शरद केळकरने साकारली आहे. त्याने पत्रकार परिषदेवेळी शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या पत्रकाराला मधेच थांबवून ती चूक दुरुस्त केली. त्याच्या या कृतीचे सोशल मीडियातून कौतुक केलं जात आहे. हा व्हिडिओ फेसबुक, ट्विटर यासह व्हॉटसअॅपवर व्हायरल होत आहे.
याआधी, कौन बनेगा करोडपती या रिऍलिटी शोमध्ये शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला गेला होता. त्यानंतर ही स्क्रिप्ट रायटिंगची चूक असल्याचे सांगत सर्वच टीमने माफी मागितली होती. या घटनेला दोन आठवड्यांचा कालावधी उलटल्यानंतर आता शरद केळकरने शिवाजी महाराजांचा होणारा एकेरी उल्लेख थांबवून छत्रपती शिवाजी महाराज अशी चूक दुरुस्त करून सांगितल्यानं त्याचं कौतुक होत आहे.
Well done @SharadK7!!! 👏🏼👏🏼@ajaydevgn #TanhajiTheUnsungWarrior #Tanhaji pic.twitter.com/Bxn0Z45J57
— अभिषेक बोके • Abhishek Bokey (@abhishekbokey) November 19, 2019
कॉमेडी आणि अॅक्शन सिनेमांमध्ये चांगल यश मिळवणाऱ्या अजय देवगणनं आता ऐतिहासिक सिनेमांकडे आपलं लक्ष वळवलं आहे. लवकरच त्याचा तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारे ‘तानाजी’ हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. काही दिवसांपूर्वीच या सिनेमातील अजय देवगण आणि सैफ अली खान यांचा फर्स्ट लुक समोर आला होता. त्यानंतर आता या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
शिवाजी महाराजांनी जिवाचं रान करुन अवघं स्वराज्य उभं केलं. पण त्यात त्यांना भक्कम साथ मिळाली ती त्याच्या निष्ठावान मावळ्यांची. या मावळ्यांपैकीच एक म्हणजे सुभेदार तानाजी मालुसरे. आपल्या मुलाचं लग्न बाजूला ठेवून केवळ 'श्रीं'च्या इच्छेखातर युद्धासाठी सज्ज होणारे सुभेदार तानाजी मालुसरे यांचा इतिहास या सिनेमात पहायला मिळणार आहे. मराठ्यांच्या इतिहासातील एक सुवर्ण पान या सिनेमातून मोठ्या पडद्यावर उलगडणार आहे. तानाजीच्या भूमिकेत अजय देवगण अगदी परफेक्ट बसलाय. तर सैफ अली खाननं उदयभानच्या रुपातील खलनायक साकारताना कोणतीही कसर सोडलेली नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा