मुंबई, 28 नोव्हेंबर : सर्व लाईन व्यस्त आहेत.....हे वाक्य आपण दिवसातून अनेकदा ऐकतो. नेहमी एकाच बाईच्या तोंडून सतत हे वाक्य ऐकल्याने ते आपल्या चांगलंच अंगवळणी पडलं असलं तरी याचं नावाचा एक सिनेमा येतोय. या सिनेमाचा पहिला टीझर प्रदर्शित झालाय.
चित्रपटाचं नाव जरी सर्व लाईन व्यस्त आहेत, असं असलं तरी यातली ‘लाईन’ जरा भलतीच दिसतेय आणि ती व्यस्त का आहे? हे सिनेमा पाहिल्यावरच समजणार असलं, तरी शीर्षकावरून आणि टीजरवरून हा सिनेमा धमाल कॉमेडी असणार हे सिद्ध होतंय.
महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव, सौरभ गोखले, हेमांगी कवी, संस्कृती बालगुडे, स्मिता शेवाळे, कमलाकर सातपुते, गौरव मोरे, नीथा शेट्टी आणि राणी अगरवाल असे कॉमेडीचे हुकुमी एक्के असलेली मंडळी नव्या वर्षाचा नवा धमाका घेऊन येत आहेत. स्टेलारीया स्टुडीयो निर्मित, अमोल उतेकर प्रस्तुत आणि प्रदीप मेस्त्री दिग्दर्शित सर्व लाईन व्यस्त आहेत हा धमाल चित्रपट नव्या वर्षात म्हणजेच 11 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
महेश मांजरेकर या सिनेमात एकदम वेगळ्या भूमिकेत आहेत. ते कलंदर साधूबुवा बनले. त्यांच्या आजूबाजूला भक्तगण आहेत.
फुल टु विनोदी असलेल्या या सिनेमात सिद्धार्थ जाधवनंही धमाल केलीय. प्रेम, लग्न यांच्याभोवती हा सिनेमा फिरतो.
या वर्षी सिद्धार्थची डबल ट्रिट आहे. एक माऊली आणि दुसरा सिंबा. दोन्ही सिनेमे डिसेंबरमध्ये रिलीज होतायत.या वर्षाची सुरुवात सिद्धूची येरे येरे पैसा सिनेमानं झाली होती. आणि आता वर्ष संपणार ते दोन मोठ्या सिनेमानं. येरे येरे पैसा रोमँटिक काॅमेडी होता. सिद्धार्थ जाधवनं त्या सिनेमात खूप धमाल केली होती. आता तो आणखी धमाल करायला येतोय, पण बाॅलिवूड सिनेमातून.
हो, सिद्धार्थ जाधव रणवीर सिंगसोबत 'सिंबा' सिनेमात काम करतोय. ' या सिनेमात मी पोलीस इन्स्पेक्टरची भूमिका करतोय. पण रोहित सरांनी अजून काही बोलायला परवानगी दिलेली नाही. ' सिद्धार्थ जाधवला आम्ही या सिनेमाबद्दल विचारलं असता, त्यानं उत्तर दिलं. काही दिवसांपूर्वी त्यानं रणवीर आणि त्याचा फोटो ट्विटही केलाय.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा