मुंबई, 31 ऑगस्ट : "मी हल्ली मूव्ही माफियांपेक्षाही मुंबई पोलिसांना घाबरायला लागले आहे. आता मला मुंबई पोलिसांकडून सुरक्षा नको. त्यापेक्षा हिमाचल प्रदेश सरकारने किंवा थेट केंद्रानेच मला सुरक्षा पुरवावी", अशा अर्थाचं Tweet कंगना रनौटने केलं होतं. त्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत चांगलेच भडकले आहेत. अशा व्यक्तींनी चंबूगबाळं आवरावं आणि आपल्या राज्यात चालतं व्हावं, असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे.
भाजप नेते राम कदम यांनी केलेल्या Tweet वर रिप्लाय देताना कंगनाने आपल्याला मुंबई पोलिसांचीच भीती वाटते, असं म्हटलं होतं.
'4 दिवसांपासून कंगना सांगते आहे की बॉलिवूड आणि ड्रग माफिया यांचा संबंध मी उघड करून सांगते, पण मला सुरक्षा द्या. दुर्दैवाने अजूनही महाराष्ट्र सरकारने तिला सुरक्षा पुरवलेली नाही', असं राम कदम यांनी नोंदवलं होतं.
Thank you for your concern sir, I am actually more scared of Mumbai police now than movie mafia goons, in Mumbai I would need security either from HP government or directly from the Centre, No Mumbai police please 🙏 https://t.co/cXEcn8RrdV
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 30, 2020
राम कदम यांनी केलेल्या Tweet वर कंगनाने हा वरचा रिप्लाय नोंदवला होता. '
याविषयी विचारलं असताना शिवसेने नेते संजय राऊत चिडले. 'हा काय तमाशा चालला आहे,' असं म्हणत 'गृहमंत्र्यांनीच यावर ताडताड उत्तर दिलं पाहिजे,' असंही त्यांनी सुचवलं. तुम्ही राहता त्या राज्याच्या पोलिसांवर असा जाहीर अविश्वास दाखवत असाल, तर ही बेइमानी आहे. इथलं मीठ खाता आणि वाटेल तसं बोलता, अशा लोकांवर कारवाई केली पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी हे वक्तव्य गंभीरपणे घ्यावं, असंही राऊत म्हणाले.