मुंबई, 06 फेब्रुवारी: असं म्हणतात मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटानं, संजय दत्त आणि विद्या बालन यांच्या करिअरला एक नवीन सुरुवात मिळवून दिली. अनेक सामाजिक विषयांना हात घालणाऱ्या या चित्रपटात विनोद, दु:ख, रोमान्स आणि मैत्री या सर्व भावना प्रेक्षकांना बघायला मिळाल्या. या चित्रपटातील प्रत्येक पात्रानं प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळा ठसा उमटवला. यामध्येच चित्रपटातील हॉस्पिटलमधील सफाई कर्मचारी मकसूद भाई या पात्राचादेखील समावेश आहे. 'बस कर, रुलाएगा क्या?' हा डायलॉग आणि 'जादू की झप्पी' आजही अनेकांच्या आठवणीत आहे. मकसूद भाई पात्र साकारणाऱ्या कलाकाराचं नाव आहे, सुरेंद्र राजन. त्यांच्याकडे बघून ते एक अतिशय सामान्य साईड अॅक्टर वाटतात. पण, प्रत्यक्षात सुरेंद्र राजन एक अतिशय अवलिया व्यक्तिमत्त्व आहे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे वाईल्ड लाइफ फोटोग्राफर, शिल्पकार आणि उच्च श्रेणीचे कलाकार आहेत. सामान्य दिसणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाची जीवन जगण्याची पद्धतदेखील खूप वेगळी आहे. 'झी न्यूज'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
सुरेंद्र राजन यांचा जन्म 1939 मध्ये मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातील अजयगड येथे झाला. जमीनदार घराण्यातील सुरेंद्र राजन यांचं कुटुंब आणि तत्कालीन राजा पुण्य प्रताप सिंह यांचे जवळचे संबंध होते. नवीन गोष्टी शिकण्यास सुरेंद्र कायम उत्सुक असायचे. त्यांच्या या गुणामुळे खूश होऊन राजा त्यांना सतत आपल्याजवळ ठेवत असे. राजेसाहेबांच्या सान्निध्यातच सुरेंद्र यांनी फोटोग्राफी शिकली.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर सुरेंद्र यांना रिवाच्या कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मात्र, त्यांना चित्रकलेची आवड होती. म्हणून, शेतीचं शिक्षण सोडून त्यांनी वडिलांच्या इच्छेविरुद्ध लखनौ कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. चित्रकला आणि शिल्पकलेत ते इतके निपुण होते की ते प्रत्येक प्राध्यापकाचे लाडके होते. शिक्षकांच्या सांगण्यावरून ते दिल्लीत आले आणि अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांमध्ये भाग घेतला. पण, कला विकण्याच्या पद्धतीला कंटाळून त्यांनी देशातील वेगवेगळ्या शहरात जाऊन वेगवेगळ्या नोकऱ्या करायला सुरुवात केली.
एक दिवस बांधवगडमध्ये वाइल्ड लाईफ फोटोग्राफी करत असताना सुरेंद्र राजन आणि लेखिका अरुंधती रॉय यांची भेट झाली. रॉय यांनी सुरेंद्र यांना बीबीसी लंडनसाठी बनवल्या जाणाऱ्या चित्रपटात कास्ट केलं. पहिल्याच चित्रपटातून त्यांना खूप प्रशंसा मिळाली. जेव्हा त्यांचे फोटो मीडियामध्ये प्रसिद्ध झाले तेव्हा त्यांच्या लूकची तुलना महात्मा गांधींशी करण्यात आली. त्यानंतर त्यांना अनेक चित्रपटांमध्ये कामाच्या ऑफर मिळाल्या.
सुरेंद्र राजन हे कदाचित एकमेव अभिनेते असतील त्यांनी कधीही चित्रपट पाहिले नाहीत. लोकांच्या दबावाखाली येऊन त्यांनी आतापर्यंत मोजून दोन चित्रपट बघितले आहेत. विशेष म्हणजे ते आवड म्हणून नाहीतर पैसे कमवण्याचं साधन म्हणून चित्रपटांत काम करतात. यातून झालेल्या कमाईच्या माध्यमातून जग फिरता येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी लग्न केलेलं नाही आणि राहण्यासाठी स्वत:चं घरदेखील विकत घेतलेलं नाही. चित्रपट किंवा इतर कोणत्याही मार्गाने जास्त कमाई झाली तर ते गोरगरिबांना मदत करतात.
सुरेंद्र राजन यांना हिमालयात राहायला आवडतं. ते म्हणतात की, 'आयुष्य लहान आहे आणि जग फार मोठं आहे. म्हणून आयुष्याचा पूर्ण आनंद घेत जगलं पाहिजे.' 84 वर्षांच्या सुरेंद्र यांनी गेल्या वर्षी 'हू आय अॅम' या आपल्या शेवटच्या चित्रपटात काम केलं. त्यानंतर त्यांनी अभिनय क्षेत्रातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment