मुंबई, ०४ फेब्रुवारी २०१९- 'डोंबिवली रिटर्न' सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. २००५ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'डोंबिवली फास्ट' सिनेमाचा ह पुढचा भाग आहे. निशिकांत कामतचं दिग्दर्शन असलेला हा सिनेमा सुपरहिट झाला होता. त्यामुळे साहजिकच 'डोंबिवली रिटर्न' सिनेमाकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 'डोंबिवली रिटर्न' सिनेमाचं दिग्दर्शन महेंद्र तेरेदेसाई यांनी केलं असून, त्यांनीच या सिनेमाचं लेखनही केलं आहे. ट्रेलरमध्ये सर्वसामान्य मध्यमवर्गीय वेलणकर कुटुंबाची कथा आणि व्यथा मांडण्यात आली आहे. अख्ख आयुष्य नोकरी, घर, संसार, प्रवासात घालवणाऱ्या एका मध्यम वर्गीय कुटुंबाची कथा यात मांडण्यात आली आहे.
संदीप कुलकर्णी साकारत असलेल्या अनंत वेलणकर या व्यक्तिरेखेभोवती हा संपूर्ण सिनेमा फिरतो. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या अनंत वेलणकरच्या आयुष्यात असं नेमकी काय घडतं की त्याला चाकोरीतली नोकरी सोडून हातात बंदूक घ्यावी लागते हे पाहणं उस्तुकतेचं असेल.
लोकलचे खडखडणारे रूळ. मुंबई महानगरातली प्रचंड गर्दी. त्याबरोबरीनं येणारे प्रश्न आणि मनातला कोलाहल. 'डोंबिवली रिटर्न' जे जातं...तेच परत येतं? या चित्रपटाच्या ट्रेलरमधून हे सगळं वेगवान आणि लक्षवेधी पद्धतीनं मांडण्यात आलं आहे.
सिनेमाच्या टीझरप्रमाणेच ट्रेलरही वेगवान आहे. मात्र यात मराठीत केलेलं डबिंग पूर्णपणे फसलेलं दिसतं. पाहत असलेले चेहरे आणि ऐकू येणारे संवाद यात फरक ट्रेलर पाहताना प्रकर्षाने जाणवतो. जे जातं... तेच परत येतं? ही सिनेमाची टॅगलाइनही लक्षवेधून घेते. येत्या २२ फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
कंरबोला क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून संदीप कुलकर्णी, महेंद्र अटोले, गुरमित सिंग, कपिल झवेरी यांनी सिनेमाची निर्मिती केली असून, महेंद्र तेरेदेसाई यांनी सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात संदीप कुलकर्णीशिवाय राजेश्वरी सचदेव, हृषिकेश जोशी, अमोल पराशर, त्रिश्निका शिंदे, सिया पाटील यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
या सिनेमाबद्दल दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई म्हणाले की, ' Money is a root cause of all evil. ‘पैसा सगळ्या दु:खाचं मुळ आहे.’ ही म्हण आपल्या मध्यमवर्गात किती खोलवर रूजलेली आहे याचं चित्र उभं करणारा हा सिनेमा आहे. ही कथा मला मुलुंड- सीएसटीच्या प्रवासात सुचली. संदीप कुलकर्णीलाही ती आवडली. आपला पहिला सिनेमा कसा असावा या बाबतीत मी आग्रही होतो. निर्माता म्हणून संदीपने तो आग्रह पूर्ण केला.'
महेंद्र तेरेदेसाई संदीप कुलकर्णीबद्दल सांगतात, 'नट म्हणून संदीप जितका प्रगल्भ आहे, तितकाच निर्माता म्हणूनही आहे. खरं तर तो माझा कॉलेजपासूनचा मित्र. आम्ही एकत्र नाटकात कामं केली होती. निर्माता म्हणून त्याच्या पहिला सिनेमा ‘प्रेमसूत्र’चे मी संवादही लिहिले होते. या सिनेमाचा कॅनव्हास खूप मोठा आहे. नावामुळे हा 'डोंबिवली फास्ट'चा सिक्वेल आहे असं वाटेलही... पण यापेक्षा समर्पक दुसरं नाव सुचलंच नाही. उद्या झालीच त्याच्याशी तुलना तरीही बरंच आहे. एका चांगल्या सिनेमाशी तुलना होणं केव्हाही चांगलंच.'