मुंबई, 29 नोव्हेंबर: बॉलिवूडचा 'भाईजान' अर्थात सलमान खान (Salman Khan) किती लोकप्रिय आहे, हे वेगळ सांगण्याची गरज नाही. आजही तो कित्येक तरुणींच्या गळ्यातला ताईत असून, त्याच्या फॉलोअर्सची संख्यादेखील प्रचंड आहे. वेळोवेळी त्याचे चाहते अनोख्या पद्धतींचा अवलंब करून आपलं प्रेम व्यक्त करण्याचा प्रयत्न करतात. सलमानदेखील चाहत्यांचं प्रेम पाहून खूश होत असतो. मात्र या वेळी सल्लूभाईनं चाहत्यांना फटकारलं आहे. काही दिवसांपूर्वी सलमान खानचा 'अंतिम - द फायनल ट्रूथ' (Antim : The Final Truth) हा चित्रपट रिलीज झाला आहे. जवळपास दोन वर्षांच्या गॅपनंतर सलमानचा चित्रपट आला आहे. त्यामुळे चाहत्यांना प्रचंड आनंद झाला आहे. त्यांनी फटाके (Firecrackers) उडवून आणि सलमानच्या पोस्टरला (Salman Khan Poster) दुधानं अंघोळ घालून आनंद व्यक्त केला आहे. हा प्रकार सलमानला समजल्यानंतर तो नाराज झाला असून, त्यानं चाहत्यांना असे प्रकार न करण्याची विनंती केली आहे. 'डीएनए'नं याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
महेश मांजरेकरचं दिग्दर्शन असलेला ‘अंतिम - द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट गेल्या शनिवारी (26 नोव्हेंबर 2021) थिएटरमध्ये दाखल झाला आहे. त्यात सलमान खान, आयुष शर्मा (Aayush Sharma) आणि महिमा मकवाना (Mahima Makwana) प्रमुख भूमिकांमध्ये आहेत. प्रदीर्घ काळानंतर सलमानचा चित्रपट रिलीज झाल्यामुळं त्याच्या चाहत्यांना खूप आनंद झाला आहे. सलमाननं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्याचे काही फॉलोअर्स चित्रपटाच्या पोस्टरवर दूध ओतताना दिसत आहेत.
View this post on Instagram
व्हिडिओ शेअर करून त्यानं चाहत्यांना एक खास विनंती केली आहे. 'अनेकांना पिण्यासाठी पाणीदेखील (Drinking Water) मिळत नाही, अशी परिस्थिती आपल्याकडे आहे. त्यामुळे अशा प्रकारे दुधाची नासाडी करणं योग्य नाही. तुम्हाला खरंच आनंद व्यक्त करायचा असेल तर ते दूध गरजू नागरिकांना द्या. अनेक गरीब मुलं आहेत, ज्यांना दूध मिळत नाही, त्यांना दूध नेऊन द्या,' अशी विनंती सलमान खाननं चाहत्यांना केली आहे.
दुधाच्या नासाडीचा व्हिडिओ शेअर करण्याच्या एक दिवस अगोदरच सलमाननं आणखी एक व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केला होता. त्या व्हायरल व्हिडिओमध्ये त्याचे चाहते थिएटरमध्ये फटाके फोडताना (firecrackers) दिसत होते. व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर सलमाननं त्याच्या चाहत्यांना थिएटरच्या सुरक्षेचे नियम पाळण्याचं आवाहन केलं होतं. 'चाहत्यांनी थिएटरमध्ये फटाके उडवू नयेत. त्यामुळे तुमचा आणि इतरांचाही जीव धोक्यात येऊ शकतो. थिएटर मालकांनाही विनंती आहे, की त्यांनी आतमध्ये फटाके नेण्यास परवानगी देऊ नये. एंट्री पॉइंटवर असलेल्या सुरक्षारक्षकांनी प्रेक्षकांची तपासणी करावी. शांततेत आणि सुरक्षित वातावरणात सर्वांनी चित्रपटाचा आनंद घ्या,' अशी विनंती सलमान खाननं केली आहे.
एकूणच सध्या आपले चाहतेच सलमानच्या चिंतेचा विषय झाले आहेत. त्यांना आततायी प्रकार करण्यापासून रोखण्यासाठी सलमानला वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून विनंती करावी लागत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Salman khan