मुंबई, 10 मार्च- 'बिग बॉस 16'मध्ये सहभागी होत शालिन भनौत प्रचंड चर्चेत आला होता. या शोमध्ये तो टॉप 4 मध्ये पोहोचला होता. शालिनसोबतच त्याची एक्स पत्नी आणि अभिनेत्री दलजीत कौरसुद्धा प्रचंड चर्चेत आली होती. शालिनची एक्स पत्नी दलजीत कौर लवकरच दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधणार आहे. येत्या 18 मार्चला दलजीत आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न करणार आहे. शालिन आणि दलजीत यांना एक मुलगासुद्धा आहे ज्याचं नाव जयडन असं आहे. त्यांच्या मुलाचं सलमान खानसोबत खास कनेक्शन आहे. दलजितने स्वतः याबाबतचा खुलासा केला आहे.
टीव्ही अभिनेत्री आणि शालीन भनौतची एक्स-पत्नी दलजीत कौर 18 मार्चला लग्नबंधनात अडकणार आहे. दलजीतने जानेवारीत बॉयफ्रेंड निखिल पटेलसोबत साखरपुडा केला होता. निखिलला एक मुलगीही आहे. त्याचबरोबर दलजीत कौरलाही एक मुलगा आहे. शालीन भनौत जयडनचा पिता आहे. घटस्फोटानंतर जयडन आई दलजीतसोबत राहात आहे. दलजीत आत्तापर्यंत सिंगल मदर बनून मुलगा जयडनची उत्तम काळजी घेत आहे. जयडनला चांगलं शिक्षण आणि लाईफस्टाईल देत आहे. दलजीतच्या मते या सगळ्यात सलमान खानचाही मोठा हातभार आहे.
शालीनपूर्वी एक्स पत्नी-अभिनेत्री दलजीत कौर 'बिग बॉस 13' मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. अभिनेत्रीने या शोमध्ये प्रेक्षकांसह सलमान खानचं मनं जिंकल होतं. नुकतंच ई टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत, दलजीत कौरने तिचं लग्न, शालीन शालीन भनौतसोबतचं नातं, मुलगा जयडन आणि सलमान खान यांच्यातील कनेक्शनबद्दल मोकळेपणाने संवाद साधला आहे. यावेळी ती म्हणाली की, सलमान खानला तिच्याबद्दल आणि जेयडनबद्दल सर्व काही माहित आहे.
बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यामुळे सलमान खानसोबत बराच संपर्क आल्याने त्याला आपल्या आयुष्याबाबत आणि आपल्या मुलाबाबत सगळं काही माहिती असल्याचं दलजीतचं म्हणणं आहे. याबाबत बोलताना दलजीत कौर म्हणाली की, सलमान खान जयडनबद्दल खूप प्रोटेक्टीव्ह आहे. तो जयडनबद्दल खूप आनंदी आहे. ती पुढे म्हणाली, “जेव्हा सलमान खान सरांनी 'बिग बॉस 16' मध्ये शालीनला सांगितलं की, तुमच्या एक्स पत्नीच्या आयुष्यात कोणीतरी आलं आहे. तेव्हा मला शूटिंगच्या काही मिनिटांतच याची माहिती मिळाली. यावर माझी प्रतिक्रिया होती- अरे देवा जी गोष्ट मी अद्याप जाहीर केलेली नाहीय. सरांनी याबद्दल आधीच नॅशनल टेलिव्हिजनवर सांगितलं आहे. त्यामुळे मी चकित झाले होते.
तसेच दलजीत कौर म्हणाली, “मी 'बिग बॉस 13' मध्ये सहभागी झाल्यापासून सलमान सर जयडनच्या जडणघडणीचा एक भाग आहेत. ते आमच्या आयुष्याबाबत सजग असतात. आम्ही संपर्कात आहे असं नाही पण त्यांना आमच्याबद्दल सर्व काही माहित असतं. जयडनला इतकं छान घर आणि शिक्षण मिळालं याचा त्यांना प्रचंड आनंद असल्याचंही दलजीतने म्हटलं आहे'.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg Boss 16, Entertainment, Salman khan, Tv actress