मुंबई, १३ आॅगस्ट- रिंकू राजगुरू म्हटलं की डोळ्यासमोर उळभी राहते ती बुलेट चालवणारी आर्ची. नुकतंच तिनं मकरंद माने दिग्दर्शित कागर सिनेमाचं शूटिंग पूर्ण केलं. कागर एक नायिकाप्रधान सिनेमा आहे.तीही एक प्रेमकथा आहे. काही दिवसांपूर्वी आर्चीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. तो होता तिच्या डान्सचा. कागरमधलंच ते नृत्य. त्यात आर्ची कमालीची बारीक दिसत होती. रिंकूनं इतकं वजन कमी कसं केलं? हा प्रश्न सगळ्यांना पडलाय. म्हणून आम्ही थेट रिंकूशीच संवाद साधला.
रिंकूनं आमच्याशी दिलखुलास बातचीत केली. ती म्हणाली, 'सैराट संपला आणि काही दिवसांनी माझ्या लक्षात आलं की मी कमालीची जाडी झालीय. तेव्हा मी दहावीची परीक्षा देत होते. इतकं जाडं असणं आरोग्यासाठी चांगलं नाहीच मुळी. म्हणून मी ठरवलं आता आपलं वजन कमी करायचं.'
वजन कमी करायचा पण आर्चीनं निश्चयच केला होता. त्यासाठी तिनं काय केलं? रिंकू सांगते, ' मी पहाटे चार वाजता उठून व्यायाम करायचे. व्यायाम म्हणजे चालायचे. त्यानंतर वाॅर्मअप आणि मग व्यायाम.' तिनं आपल्या डाएटकडेही विशेष लक्ष दिलं होतं. ती म्हणाली, 'मी सकाळ आणि संध्याकाळ फक्त सॅलड खात होते. मला गोड जास्त आवडतं,पण तेही मी सोडलं. घरात गुलाबजाम वगैरे गोड पदार्थ बनत असतील तर मी तिथे फिरकायचीही नाही.' इतकंच काय रिंकूसमोर कुणी गोड पदार्थ खात असेल तर ती तिथून उठून निघून जायची.
यासाठी तिनं कुणी ट्रेनर नव्हता ठेवला. ती सांगते, तिची आईच तिची ट्रेनर आणि डाएटिशियन, या सगळ्याचा फायदा असा झाला की, २ ते ३ महिन्यात तिचं १२ किलो वजन कमी झालं. मध्यंतरी तिनं एक दक्षिणेकडचा सिनेमा केला होता. पण तो फारसा चालला नाही. तरीही ती सांगते, ' वेगळ्या भाषेतला सिनेमा बरंच काही शिकवून गेला. भाषा शिकता आली. ' दक्षिणेकडेही लोकांनी जास्त मराठी सैराटच पाहिल्याचं ती सांगते.
'सैराट'नं रिंकूला प्रचंड प्रसिद्धी दिली. त्याबद्दल बोलताना ती सांगते, 'पहिल्यांदा अवघडल्यासारखं व्हायचं. पण वेगवेगळ्या लोकांना भेटताना छान वाटलं.' रिंकू तरुणपिढीला काही सल्लाही दतेय. तो खूप महत्त्वाचा आहे. ती म्हणते, ' सैराटनंतर खेडेगावातल्या मुलामुलींना सिनेमाची आॅफर देणारे भेटतात. तेही हुरळून जातात. पण कुणीही येऊन सिनेमा करतो म्हणाला तर सावध राहा.' ती म्हणते, ' रिंकूला ओळख आर्चीनं दिली. आणि मीही फार वेगळी नाही. मी आर्चीसारखीच आहे.' रिंकूचा कागर सिनेमा दिवाळीच्या सुमारास रिलीज होईल. कदाचित तिच्यासाठी तो नवी ओळख घेऊन येईल.
बारीक व्हायचंय तर या ५ गोष्टी कराच
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sairat, आर्ची, रिंकू राजगुरू