निर्माते,लेखक अजेय झणकर यांचं निधन

निर्माते,लेखक अजेय झणकर यांचं निधन

लेखक निर्माते अजेय झणकर यांचं काल यकृताच्या विकाराने निधन झालं. सरकारनामा आणि लेकरू या सिनेमांचं त्यांनी लेखन केलं होतं.

  • Share this:

03 एप्रिल : लेखक निर्माते अजेय झणकर यांचं काल यकृताच्या विकाराने निधन झालं. वयाच्या 57व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली. सरकारनामा आणि लेकरू या सिनेमांचं त्यांनी लेखन केलं होतं. तर या सिनेमांची त्यांनी निर्मितीही केली होती.

अजेय झणकर यांचा जन्म १ सप्टेंबर १९५८ रोजी पुण्यात झाला. मराठी, संस्कृत, इतिहास हे त्यांच्या अभ्यासाचे विषय होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून मराठी विषयात सुवर्णपदकासह पदव्युत्तर पदवी घेतल्यावर ते लेखन, चित्रपट निर्मिती आणि जाहिरात क्षेत्राकडे वळले. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांनी लेखनाचे विशेष पारितोषिक पटकावल्यानंतर त्यांच्या लेखनप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.

‘सरकारनामा’, ‘द्रोहपर्व’ या त्यांच्या कादंबऱ्या प्रकाशित झाल्या होत्या.या कादंबऱ्याना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले आहेत.सरकारनामा या कादंबरीवर चित्रपटाची निर्मितीही त्यांनी केली होती.मराठी चित्रपटसृष्टीतील मैलाचा दगड ठरलेला,चित्रपट म्हणून ‘सरकारनामा’ची ओळख आहे.

या चित्रपटातील ‘अलवार तुझी चाहुल’ या गाण्याचे गीतकार अशी बहुढंगी भूमिका त्यांनी बजावली. या चित्रपटाला ‘फिल्मफेअर’, राज्य शासनाचा चित्रपट पुरस्कार, ‘स्क्रीन’ पुरस्कार असे अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार मिळाले होते.

त्यानंतर ‘लेकरू’ हा चित्रपट, ‘दौलत’ ही मालिका, शेतकऱ्यासाठीच्या ‘भूमिपुत्र’ या कार्यक्रमासाठी त्यांनी लेखन केलं होतं. हॉलिवूडपर्यंत त्यांनी धडक मारली होती. त्यांच्या ‘द्रोहपर्व’ या कादंबरीवर इंग्रजीत 'सिंग्युलॅरिटी' नावाचा चित्रपटही बनला होता. मात्र हा सिनेमा दोन स्टुडिओजमधील भांडणापायी रिलीज होऊ शकला नाही.

झणकर यांनी जाहिरात क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ‘मार्केट मिशनरीज’ संस्थेचे ते संस्थापक होते.

'सरकारनामा 2' या सिनेमाची तयारीही त्यांनी सुरू केली होती. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने मराठी सिनेसृष्टीची मोठी हानी झालीय.

First published: April 3, 2017, 1:00 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading