नीलिमा कुलकर्णी, 24 मे : क्रिकेटचा देव, मास्टर ब्लास्टर सचिन.भारतरत्न सचिन तेंडुलकरच्या उत्तुंग कारकिर्दीवर आधारीत सिनेमा - सचिन-अ बिलियन ड्रीम्स येत्या शुक्रवारी (26 मे ) आपल्या भेटीला येतोय.डॉक्युफिचर प्रकारात मोडणाऱ्या या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय हॉलिवूडचे दिग्दर्शक जेम्स अरस्किन यांनी.
या सिनेमाच्या निमित्ताने सचिनने आपल्या मोठ्या भावाला म्हणजेच अजित तेंडुलकरला एक खास मेसेज दिलाय एका स्पेशल व्हिडिओमधून. अजित तेंडुलकर जे नेहमीच सचिनच्या मागे सावलीसारखे उभे राहिले त्यांचं सचिनच्या आयुष्यात असलेलं अनमोल स्थान या व्हिडिओव्दारे पुन्हा समोर आलंय. लहानपणी सर्वात आधी सचिनचं क्रिकेटवेड ज्यांनी हेरलं ते म्हणजे अजित तेंडुलकर, या मोठ्या भावाने सचिनची खेळातली चमक ओळखली आणि आचरेकर सरांकडे नेलं आणि मग एकापेक्षा एक विक्रम मोडणारा यशाचा चढता आलेख आपल्या सर्वांच्याच समोर आहे.
विशेष म्हणजे अजित तेंडुलकर यांनी कधीच लाईमलाईटमध्ये येणं पसंत केलं नाही.सचिन तेंडुलकरने भारताला वर्ल्ड कप मिळण्याचं स्वप्न पाहिलं आणि अजित तेंडुलकर यांनी सचिनला वर्ल्डकप हातात घेताना पाहण्याचं. दोघंही एकाच ध्येयाने प्रेरित. अजित तेंडुलकरांचं हे बंधुप्रेम म्हणूनच आदर्शवादी ठरतं. स्वार्थापलिकडे भावाच्या उत्कर्षासाठी सातत्याने झटणं हे प्रत्येकालाच जमतं असं नाही. स्टेडियममध्ये सचिन,सचिन अशी आरोळी जेव्हा सचिनचे चाहते द्यायचे तेव्हा एका कोपऱ्यात बसून अजित तेंडुलकर सचिनचा खेळ एकाग्रतेने पाहत बसलेले असायचे.
'सचिन - अ बिलियन ड्रीम्स' या सिनेमाच्या निमित्ताने या दोघा भावांचे , सचिनच्या कुटु्ंबियांचे भावनिक क्षणदेखील पहायला मिळतील,. अजित तेंडुलकर यांची किशोर वयातील भूमिका सिनेमात मयुर मोरेने साकारलेय.दिग्दर्शक जेम्स अरस्किन यांनी हा सिनेमा बनवण्यापूर्वी रिसर्चसाठी अजित तेंडुलकर यांच्याकडून बरीच माहिती घेतली आणि मग या सिनेमाला खऱ्या अर्थाने किकस्टार्ट मिळाला.
या सिनेमाच्या निमित्ताने सचिनच्या चाहत्यांचं स्वप्न आता साकारतंय.आपल्या लाडक्या सचिनला 70 एमएम स्क्रीनवर ते पाहणार आहेत चित्रपटगृहात. टाळ्या शिट्ट्यांच्या नादात तेव्हा ते चित्रपटगृह कदाचित स्टेडियमसदृश भासलं तर नवल वाटायची गरज नाही. कारण ते असतील सचिनला पाहणारे बिलियन डोळे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा