मुंबई, 31 डिसेंबर: सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनानंतर सर्वाधिक नाव चर्चेत आलेलं नाव म्हणजे रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty). ड्रग्ज प्रकरणात तिला अटक करण्यात आली होती, अनेक दिवस तुरूंगात घालवल्यानंतर आता रिया तिच्या करियरवर लक्ष केंद्रित करत आहे. 2020 च्या वाईट आठवणींना विसरून रिया नवीन वर्षात नवीन काम करणार आहे. रिया चक्रवर्ती आणि दिवंगत सुशांत सिंह राजपूतचे जवळचे मित्र आणि लेखक रूमी जाफरी (Rumi Jaffery) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
रुमी जाफरीने नुकतीच स्पॉटबॉयला एक मुलाखत दिली होती, ज्यात त्यानं सांगितलं की हे वर्ष रिया चक्रवर्तीसाठी अत्यंत क्लेशदायक होतं. हे वर्ष प्रत्येकासाठी खूप वाईट होतं. पण रियाला या वर्षात अनेक धक्के सहन करावे लागले. एका मध्यमवर्गीय कुटुंबातील एक मुलगी तुरूंगात महिनाभर घालवते तेव्हा तिच्या मनावर काय आघात होत असतील याची तुम्ही कल्पना करू शकता.
रूमी जाफरी यांनी रियाला आश्वासन दिलं आहे की, संपूर्ण इंडस्ट्री तिचं स्वागत मनापासून करेल. मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की, नुकतीच त्यांची भेट रियाशी झाली. ती खूप शांत होती आणि जास्त बोलत नव्हती. ती खूप निराश असल्यासारखी वाटत होती.
सुशांत सिंग राजपूतचं 14 जून 2020 रोजी निधन झालं होतं. सीबीआय, ईडी आणि एनसीबी या तिन्ही तपास यंत्रणा या प्रकरणाच्या चौकशीत गुंतल्या आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणात रियाचं नाव समोर आलं आणि त्यानंतर तिला आणि तिच्या भावाला तुरुंगात जावं लागलं होतं.
रिया ड्रग्सप्रकरणी महिनाभर तुरूंगात होती. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला. तर शौविकला मुंबई हायकोर्टाने तीन महिन्यांनंतर जामीन मंजूर केला. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचा तपास अजूनही सुरू आहे.