मुंबई, 24 नोव्हेंबर : ज्येष्ठ अभिनेते दादा कोंडके यांनी रसिकांच्या मनावर असंख्य वर्ष राज्य केलं. दादा कोंडके यांच्या आयुष्याबद्दल अनेकांना कुतूहल आहे. म्हणून अक्षय कुमार आणि अश्विनी यार्दी यांनी मिळून दादा कोंडकेंवर सिनेमा काढायचं ठरवलं. पण आता यात बऱ्याच उलथापालथी झाल्यात.
आता हा सिनेमा मराठीत बनणार आहे. हिंदीत नाही. त्यामुळे अक्षय कुमार यातून बाहेर पडला. आता एकमेव अश्विनी यार्दी या सिनेमाची निर्मिती करणार आहेत. अनेक जणांनी दादा कोंडके यांच्यावर सिनेमा बनवण्याचे हक्क घेतले होते. त्यामुळे या सिनेमाला हक्क मिळण्यासाठी बरंच झगडावं लागलं.
सिनेमा हिंदीत बनणार होता, तेव्हा अभिनेता रितेश देशमुखची निवड केली होती. पण सिनेमाला उशीर झाल्यानं रितेश त्याच्या माऊली सिनेमात बिझी झाला. सूत्रांच्या माहितीनुसार रितेश आता हा सिनेमा करत नाहीय. अश्विनी आता दादा कोंडकेंच्या भूमिकेसाठी नवा चेहरा शोधतायत.
दरम्यान आता या मराठी सिनेमाचं दिग्दर्शन उमेश कुलकर्णी करणार आहे. वळू, देऊळ, विहीर असे पारितोषिक प्राप्त सिनेमे दिल्यामुळे उमेशकडून खूप अपेक्षा आहेत. सध्या सिनेमाची पटकथा फायनल होतेय. ती तयार झाली की दादा कोंडके यांच्या भूमिकेसाठी अभिनेत्याचा शोध सुरू येईल.
मराठीत सेक्स काॅमेडी आणली ती दादांनी. एकाच वेळी 9 सिनेमे 25 आठवडे चालवून दादा कोंडकेचं नाव गिनीज बुकमध्ये गेलंय.
मराठीत बायोपिक यशस्वी होतात. टिळक, बालगंधर्व आणि आता काशिनाथ घाणेकर हे सिनेमे चांगले चालले. दादा कोंडकेंवरचा हा सिनेमाही यशस्वी होईल.