मुंबई, 25 मार्च : ऋषी कपूर त्यांच्या अभिनयासोबतच स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जात होते. आपल्या करिअरमध्ये त्यांनी 'बॉबी', कभी कभी, कर्ज आणि चांदनी यांसारख्या अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केले. त्यांचे प्रत्येक पात्र चाहत्यांना वेड लावत असे. त्यांची प्रत्येक अभिनेत्रीसोबतची केमिस्ट्री छान दिसत होती. आपल्या बिनधास्त स्वभावानं ते सर्वांची मने जिंकत असत. त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी त्यांच्या आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाची गुपिते उघड केली आहेत. त्यांच्या पुस्तकात त्यांनी सांगितलेला एक किस्सा आज आम्ही तुमच्यासोबत शेअर करणार आहोत.
आपल्या अभिनयाव्यतिरिक्त ऋषी कपूर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी आणि त्यांच्या कठोर स्वभावामुळे अनेकदा चर्चेत असायचे. अभिनेत्याने 15 जानेवारी 2017 रोजी 'खुल्लम खुल्ला - ऋषी कपूर अनसेन्सॉर' केलेले आत्मचरित्र प्रसिद्ध केले. मीना अय्यर यांच्यासोबत त्यांनी ते लिहिले आहे. यामध्ये त्यांनी त्याच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी उघड केल्या आहेत. यासोबतच त्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटाला मिळालेल्या पुरस्काराबाबतही आपल्या पुस्तकात एक मोठं गुपित उघड केलं आहे.
ऋषी कपूर यांनी 1973 मध्ये 'बॉबी' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटात त्यांच्या विरुद्ध डिंपल कपाडिया दिसली होती. या चित्रपटासाठी ऋषी कपूर यांना फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक वर्षांनी ऋषी यांनी स्वत: त्यांच्या आत्मचरित्रात याच्याशी संबंधित एक मोठा खुलासा केला आहे की, त्यांनी हा मोठा पुरस्कार अभिनयाच्या जोरावर नाही तर पैशाने विकत घेतला आहे.
हे सांगताना त्यांनी लिहिलं आहे कि, “ मला 'बॉबी'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर अमिताभ फारसे खूश नाहीत. कारण त्याला 'जंजीर'साठी हा पुरस्कार मिळेल, असं वाटत होतं. हे दोन्ही चित्रपट 1973 साली प्रदर्शित झाले होते. पण आज एवढ्या वर्षानंतर मी खुलासा करतोय कि, हा पुरस्कार मी तेव्हा 30,000 रुपयांना विकत घेतला होता आणि हे सांगताना मला वाईट वाटतंय.'
त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी अभिनेते अमिताभ यांच्याबद्दल लिहिले आहे की, “अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या प्रतिभेच्या जोरावर 1970 च्या सुरुवातीला ट्रेंड बदलला होता. त्याच्यापासूनच अॅक्शन सीन्स सुरू होतात. त्या काळात अनेक कलाकार त्यांच्यासमोर अपयशी ठरले होते. ही माझ्या करिअरची सुरुवात होती आणि मी खूप लहान होतो. त्याकाळी कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा चित्रपटात हिरो असायचा. माझ्यात एक गोष्ट चांगली होती ती म्हणजे मी माझ्या कामाबद्दल खूप गंभीर होतो. माझा असाही विश्वास आहे की उत्कटतेमुळेच तुम्हाला यश मिळते. अमिताभ आणि माझ्यात भांडण न होता तणाव असायचा. पण आम्ही याबद्दल कधीच विचार केला नाही आणि सर्वकाही स्वतःहून ठीक झाले आणि नंतर आम्ही 'अमर अकबर अँथनी' चित्रपटात एकत्र काम केले आणि या चित्रपटानंतर आम्ही दोघे एकमेकांचे मित्र झालो.
ऋषी कपूर शेवटच्या दिवसापर्यंत चित्रपटात काम करत राहिले. आपल्या अभिनय कारकिर्दीत त्यांनी असे अनेक चित्रपट केले आहेत, जे सदाबहार ठरले आहेत. आज जरी ऋषी कपूर आपल्यात नसले तरी मात्र चाहत्यांच्या हृदयात ते कायम जिवंत राहतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Bollywood actor, Bollywood News, Entertainment