S M L

रिंकू राजगुरू पुन्हा एका मराठी चित्रपटात

रिंगण या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा दिग्दर्शक मकरंद माने याच्या नव्या चित्रपटात रिंकू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 23, 2017 10:25 AM IST

रिंकू राजगुरू पुन्हा एका मराठी चित्रपटात

23 ऑक्टोबर:  रिंकू राजगुरूनं सैराट या चित्रपटातील आर्ची या भूमिकेतून आपल्या रावडी अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. सैराटला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर  अवघ्या महाराष्ट्राला प्रतीक्षा आहे, तिच्या पुढच्या चित्रपटाची. आता दिवाळीच्या मुहूर्तावर रिंकूच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. रिंकू राजगुरू लवकरच एका मराठी चित्रपटातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रिंगण या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचा दिग्दर्शक मकरंद माने याच्या नव्या चित्रपटात रिंकू महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

दिवाळीच्या मुहूर्तावर या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. अद्याप या चित्रपटाचं नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आलं आहे. मात्र, सर्वांना भावेल असं कथानक या चित्रपटात पहायला मिळणार आहे. सोबतच श्रवणीय संगीताची पर्वणीही असेल. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे सुधीर कोलते आणि विकास हांडे या चित्रपटाची निर्मिती करत आहे. सुधीर कोलते यांनी या पूर्वी 'चिडिया' या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यात विनय पाठक यांची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं ते मराठी चित्रपट निर्मितीमध्ये पदार्पण करत आहेत.

मकरंद आणि रिंकू या दोघांना एकाच वेळी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. तसंच मकरंद आणि रिंकू दोघंही अकलूजचे आहेत. मकरंदचा 'रिंगण' हा चित्रपट राष्ट्रीय पुरस्कारासह अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवला गेला आहे.


चित्रपटाविषयी माहिती देताना मकरंद म्हणाला, 'चित्रपट सर्वांना भावेल अशी मला खात्री वाटते. आपण जेव्हा एखाद्या कथेची मांडणी करत असतो, तेव्हा त्यातील पात्र असू देत किंवा इतर गोष्टी या चित्र स्वरूपात आपण पाहण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यानुसार त्या सर्व बाबींचा शोध सुरू होतो. रिंकूच्या रूपाने या कथेच्या नायिकेचा शोध पूर्ण झाला. चित्रपटाची गोष्ट ऐकून तिनंही तात्काळ चित्रपटात काम करण्यासाठी होकार दिला. तिनं या चित्रपटात काम करणं ही आमच्या टीमसाठी आनंदाची बाब आहे.'

'मकरंदचा रिंगण हा चित्रपट आम्ही पाहिला होता. त्याची गोष्ट सांगण्याची पद्धत विलक्षण आहे. त्याला चित्रपट हे माध्यम नेमकं माहीत आहे. त्यामुळे त्यानं या चित्रपटाचं कथानक ऐकवल्यावर आम्हाला ते आवडलं. आजुबाजूला घडणारं वातावरण संवेदनशील पद्धतीनं या चित्रपटात मांडलं जाणार आहे,' असं निर्माते सुधीर कोलते यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 23, 2017 10:24 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close