मुंबई, 26जानेवारी : भारताचा 74वा प्रजासत्ताक दिन आज देशभरात मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून देशवासीयांना शुभेच्छा देण्यात आल्यात. प्रजासत्ताक दिनानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. नवी दिल्लीत कर्तव्यपथावर ( राजपथावर ) आज तिन्ही सैन्यदलांकडून परेड सोहळा होणार आहे. वर्षभर ज्या सोहळ्याची सगळेच वाट पाहत असतात असा हा सोहळा आज पाहायला मिळणार आहे. कर्तव्यपथावर आज एक खास आकर्षण म्हणजे विविध चित्ररथांमधून भारतीय संस्कृतीचं होणारं दर्शन. यात यंदा महाराष्ट्राच्या चित्ररथाची देखील निवड करण्यात आली आहे. मराठमोळा संगीतकार आज कर्तव्यपथ गाजवताना दिसणार आहे. प्रसिद्ध मराठी संगीतकार कौशल इनामदार यांचं संगीत आज महाराष्ट्राच्या चित्ररथावर ऐकायला मिळणार आहे. कौशल इनामदार यांनी स्वत: पोस्ट लिहित ही माहिती दिली आहे.
अनेक मराठी मालिका आणि सिनेमांमधून आपल्या संगीतानं वेगळी ओळख करणारे संगीतकार कौशल इनामदार यांच्यासाठी आजचा प्रजासत्ताक दिनाचा दिवस फारच अभिमानाचा आहे. आजवर त्यांनी अनेक गीतांना संगीत दिलं आहे मात्र महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी संगीत देणं हा त्यांच्यासाठी नक्कीच वेगळा अनुभव असणार आहे. कौशल इनामदार यांनी पोस्ट शेअर करत सर्वांचे आभार मानले आहेत. महाराष्ट्राच्या चित्ररथात यंदा पारंपरिक मराठमोळ्या गोंधळाचं संगीत ऐकायला मिळणार आहे.
हेही वाचा - Oscar Award 2023 Nomination: 'नाटू नाटू' गाण्याचा ऑस्करमध्ये डंका! अखेर मिळालं नॉमिनेशन
कौशल इनामदार यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिलंय, 'महाराष्ट्राच्या साडेतीन शक्तीपीठांचे दर्शन घडवणाऱ्या कर्तव्यपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक फ्लोटमध्ये गोंधळ परंपरेवर आधारित माझे संगीत असेल ही माझ्यासाठी आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे'.
It’s a matter of great happiness and pride for me that the cultural float of Maharashtra to roll down the Kartavya Path depicting the 3 ½ Shakti Peeth of Maharashtra will have music composed by me based on the Gondhal tradition. I couldn’t have done this without my friends and pic.twitter.com/ksNxVdjyIb
— Kaushal S Inamdar| कौशल इनामदार (@ksinamdar) January 26, 2023
त्यांनी पुढे सर्वांचे आभार देखील मानलेत. त्यांनी म्हटलंय, 'मी माझ्या मित्रांशिवाय हे करू शकलो नसतो. अमित पाध्ये, अनिल करंजवकर, सिद्धेश जाधव, नंदेश उमप, गायिका अमृता खोडके-दहिवेलकर, प्रगती जोशी, मधुरा परांजपे आणि विवेक कांबळी, यांचे आभार.'
कौशल इनामदार यांच्या कामाविषयी सांगायचं झालं तर, 'मराठी अभिमान गीत' हे देखील त्यांनी संगीतबद्ध केलं आहे. त्यांची अनेक गाणी महाराष्ट्राच गाजली. 'बालगंधर्व', 'अजिंठा' सारख्या सिनेमांसाठी त्यांनी संगीत दिलं आहे. 'सारेगमपा' सारख्या प्रसिद्ध कार्यक्रमात ते परीक्षक म्हणून दिसले आहेत. कौशल इनामदार यांना 'रघुपती राघव राजाराम' या नाटकासाठी महाराष्ट्र राज्य नाट्य पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment, Marathi news, Republic Day 2023