मुंबई, 11 डिसेंबर: प्रसिद्ध कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक रेमो डिसूझा (Remo D'Souza) यांना हृदयविकाराचा झटका आल्याने कोकिलाबेन रुग्णायलात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार रेमो डिसूझा यांची एंजिओप्लास्टी सर्जरी करण्यात आली आहे आणि त्यांची प्रकृती सध्या स्थीर आहे. त्यांची पत्नी लिझेल (Lizelle)यावेळी त्यांच्याबरोबर आहे. रेमो डिसूझा यांना हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर येताच त्यांच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. रेमो यांची प्रकृती लवकरात लवकर ठीक व्हावी याकरता चाहत्यांकडून प्रार्थना केली जात आहे. सोशल मीडियावरही त्यांच्या प्रकृती स्वास्थ्याबाबत प्रार्थना केली जात आहे.
'रेस 3', 'ABCD' या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या या 46 वर्षीय दिग्दर्शक, डान्सर आणि कोरिओग्राफर रेमो डिसूझा यांचे अनेक चाहते आहेत. बॉलिवूडमध्ये त्यांनी डान्समध्ये विविध यशस्वी प्रयोग केले आहेत. सध्या त्यांना रुग्णालयात दाखल केलं असल्याने चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. त्यांची पत्नी लिझेल रेमो यांच्याबरोबर आहे. लिझेल यांनी काही तासांपूर्वीच इन्स्टाग्राम स्टोरीवर रेमो यांच्याबरोबर एक फोटो शेअर केला होता.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर रेमो डिसूझा यांनी दिग्दर्शन केलेला शेवटचा सिनेमा 'Street Dancer 3D' हा होता. यामध्ये श्रद्धा कपूर, वरूण धवन, नोहा फतेही अशी तगडी स्टारकास्ट दिसली होती. रेमो यांचा डान्स परिवार आणि इतर मित्र-परिवार यांंच्याकडून त्यांची तब्येत लवकर बरी व्हावी याकरता प्रार्थना केली जात आहे.