मुंबई, 31 डिसेंबर : सुपरस्टार अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) होस्ट करत असलेला शो कौन बनेगा करोडपती (KBC 12) सध्या भारतात मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. या शोमधील स्पर्धकांमुळे देखील हा शो खूप लोकप्रिय होत असून यावर्षी अनेक स्पर्धकांनी 1 कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत झेप घेतली आहे. पण कुणालाही 7 कोटी रुपये जिंकण्यात यश आलेलं नाही. या सिजनमध्ये आतापर्यंत 3 महिलांनी 1 कोटी रुपये जिंकले आहेत. त्यानंतर आता पुन्हा एक महिला 1 कोटी रुपयांच्या प्रश्नापर्यंत पोहोचली आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरीमधील ही महिला 1 कोटी रुपयांचा प्रश्न खेळणार असून आज हा भाग प्रदर्शित केला जाणार आहे.
भावना वाघेला (Bhawna Waghela) असं या महिला स्पर्धकाचं नाव असून या भागामध्ये त्या हॉटसीटवर आल्या होत्या. भावना या प्राथमिक शिक्षिका असून त्या पहिलीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात. या भागात त्यांनी अमिताभ यांच्याबरोबर गप्पा मारताना आपल्या पतीबरोबर झालेल्या फसवणुकीची कथा सांगितली. आपल्या पतीचा मित्र आणि त्यांच्या पतीने भंगाराचा व्यवसाय करण्यासाठी प्रत्येकी 50 लाख रुपये भांडवल गोळा करण्याचे ठरवलं. यासाठी त्यांनी विविध मार्गानी पैसे साठवले. आपल्या आईची जमीन विकून तसेच स्वतःचे दागिने विकून आणि काही पैसे उधार घेऊन त्यांनी ही रक्कम जमा केली. यानंतर ही रक्कम पतीच्या मित्राला दिली असता तो पैसे घेऊन फरार झाला. यामुळे त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि आजपर्यंत त्या ते कर्ज फेडत आहेत. केबीसीमध्ये जिंकलेल्या पैशातून त्या आपल्या पतीचे कर्ज सोडवण्यासाठी मदत करणार आहेत.
भावना यांना विचारण्यात आलेले प्रश्न -
पारंपरिक केक तयार करण्यासाठी यामधील कोणता पदार्थ वापरला जात नाही.
उत्तर- मेथी
भारत सरकारकडून दिल्या जाणाऱ्या 'श्री...', '...भूषण' आणि '...विभूषण' या तीन पुरस्काराना कोणता शब्द पूर्ण करतो?
उत्तर: पद्म
तुलसीदास यांनी रचलेले ग्रंथ कोणत्या देवावर आधारित आहेत?
उत्तर : विष्णू ,या उत्तरासाठी त्यांनी 50-50 लाइफ लाइन वापरली.
ए. आर. रहमान यांनी संगीतबद्ध केलेलं हे गाणं कुणी गायलं आहे?
उत्तर : आशा भोसले, यासाठी त्यांना एक गाणं ऐकवण्यात आलं होतं.
कोरोना कालखंडात विविध झोन तयार करण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर करण्यात आला नव्हता?
उत्तर : निळा रंग
ब्लिचिंग पावडर कोणत्या रासायनिक घटकांचे संयुग आहे?
उत्तर : कॅल्शिअम, परंतु माहित नसल्याने त्यांनी फ्लिप द क्वेश्चन लाइफ लाइन वापरली.
कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही?
उत्तर -आंध्र प्रदेश
या फोटोमधील रंगीत भागात कोणते वाळवंट दिसत आहे
उत्तर- सहारा
व्हिडीओ क्लिपमधील या महिला पैलवानाला ओळखा.
उत्तर - विनेश फोगाट
पुण्यातील शनिवारवाड्यामध्ये सर्वात प्रथम कोण राहायला गेलं होतं?
उत्तर - पहिले बाजीराव पेशवे
आपल्या राजकीय कारकिर्दीत प्रणव मुखर्जी यांनी यामधील कोणतं पद सांभाळलं नाही
उत्तर- गृह खातं, यासाठी त्यांनी व्हिडीओ कॉल या फ्रेंड लाईफ लाईनचा वापर केला.
ब्लॅक होलचा गणितीय सिद्धांत तयार करणाऱ्या आणि भौतिकशास्त्रातील 1983 चे नोबेल पुरस्कार जिंकणाऱ्या या व्यक्तीला ओळखा.
उत्तर - एस. चंद्रशेखर
हिंदू तत्वज्ञानापैकी जर सांख्य, न्याय, वैसेशिक, मीमांसा आणि वेदांत ही पाच दर्शने असतील तर सहावे काय असेल?
उत्तर- योग, यासाठी त्यांनी आस्क द एक्स्पर्ट हा प्रश्न विचारला.
'गिफ्ट टू मोनोथेइसट्स' इंग्रजी शीर्षक असलेलं पुस्तक राजा राममोहन राय यांनी कोणत्या भाषेत लिहिले होते?
उत्तर – फारसी