मुंबई, ०६ एप्रिल- हॉलिवूड स्टार विल स्मिथ जेव्हाही भारतात येतो तेव्हा आपल्या हटके अंदाजाने तो साऱ्यांचं मन जिंकतो. गेल्यावेळीही जेव्हा तो भारतात आला होता तेव्हा त्याचा वेगळाच अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला होता. तो कधी रिक्षा चालवताना तर कधी स्टुडंट ऑफ दी इअर २ सिनेमाच्या सेटवर डान्स करताना दिसला. यावेळीही त्याचा रणवीर सिंगसोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. नेहमीप्रमाणे हा व्हिडिओही त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.
सोशल मीडियावर रणवीर आणि विल स्मिथचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओत रणवीर स्मिथला ‘पैसा वसूल’ हा शब्द बोलायला शिकवत आहे. विलही हा शब्द लगेच शिकतो आणि दोघं एकत्र हा शब्द पुनः पुन्हा उच्चारत त्या शब्दाची मजा घेत आहेत. विशेष म्हणजे स्मिथला या शब्दाचा अर्थ माहीतही नसताना तो, ‘पाहा हा पैसा वसूल’ व्हिडिओ असं म्हणताना दिसत आहे. झूम टीव्हीने त्यांच्या इन्टाग्राम अकाउंटवर हा व्हायरल व्हिडिओ शेअर केला आहे.
रणवीरच्या आगामी सिनेमाबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘८३’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तो कपिल देव यांची भूमिका साकारणार आहे. १९८३ मध्ये भारताने पहिल्यांदा क्रिकेट वर्ल्डकप जिंकला होता. याच विषयावर ‘८३’ हा सिनेमा असणार आहे.