हा रणवीरच आहे! अभिनेत्याने शेअर केली धोनीबरोबरची 12 वर्षांपूर्वीची आठवण, पाहा PHOTO
माहीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केल्यानंतर अनेकांनी त्याच्या आठवणी सांगणाऱ्या पोस्ट शेअर केल्या आहेत. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने देखील धोनीची खास आठवण शेअर केली आहे. साधारण 2007-08 मधला एक फोटो त्याने शेअर केला आहे.
मुंबई,17 ऑगस्ट : शनिवारी जेव्हा संपूर्ण देश स्वातंत्र्यदिन साजरा करत होता, तेव्हा त्याच संध्याकाळी भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने (Mahedra Singh Dhoni) आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीनंतर संपूर्ण देश हळहळला. दरम्यान अनेकांनी सोशल मीडियावर त्याच्या आठवणीच्या, त्याच्या क्रिकेटमधील योगदानाच्या पोस्ट सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने देखील धोनीची खास आठवण शेअर केली आहे. साधारण 2007-08 मधला एक फोटो त्याने शेअर केला आहे. यामध्ये अवघा बावीस वर्षांचा असणारा रणवीर फारच वेगळा दिसत आहे.
रणवीरने हा फोटो शेअर करताना असे म्हटले आहे की, 'हा फोटो साधारण 2007-08 साली कर्जतमधील एनडी स्टुडिओमध्ये काढण्यात आला आहे. मी तेव्हा 22 वर्षांचा होतो, असिस्टंट डिरेक्टर म्हणून काम करत होतो. आणि मी हा जॉब घेतला कारण फक्त आणि फक्त एमएस धोनी या अॅड फिल्ममध्ये दिसणार होता. मला खूप काम दिले जायचे तर पैसे कमी मिळत होते. पण मला त्याची तमा नव्हती कारण मला फक्त त्याच्या सहवासामध्ये राहायचे होते. मला त्याला भेटण्याची आणि फोटो काढण्याची परवानगी मिळाली. मी जेव्हा त्याला भेटलो तेव्हा अवाक झालो होता. कारण तो खूप नम्र, डाउन-टू-अर्थ आणि प्रेमळ होता. माझं प्रेम आणि आदर त्यावेळी अधिकच वाढला'.
रणवीरने या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, एखाद्या खऱ्या फॅनबॉयप्रमाणे त्याने देखील त्याच्या टोपी आणि जर्सीवर धोनीची स्वाक्षरी घेतली आहे. धोनीबद्दल त्याने ही लांबलचक पोस्ट शेअर केली आहे. त्याच्या प्रत्येक शब्दामध्ये धोनीबद्दल असणारे प्रेम आणि तो त्याचा किती मोठा चाहता आहे हे दिसून येत आहे.
सौरव गांगुलीनंतर धोनीनं संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आणि भारताला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले. मात्र 2019 वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं. धोनीनं 15 ऑगस्ट रोजी निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. इन्स्टाग्रामवर धोनीनं व्हिडीओ शेअर करत क्रिकेटला अलविदा केला.