मुंबई,27ऑक्टोबर-“मी हा पुरस्कार कर्नाटकातील माझा बसचालक मित्र, माझा सहकारी राज बहादूर (Raj Bahadur) यांना समर्पित करतो… मी जेव्हा बस कंडक्टर होतो तेव्हा त्यांनीच माझ्यातील अभिनय कौशल्य ओळखलं आणि मला सिनेमात येण्यासाठी प्रोत्साहन दिलं..."हे आहे दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत (Rajinikanth) यांचं मानाचा दादासाहेब फाळके पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेलं भाषण. मंगळवारी (26 ऑक्टोबर 2021) रजनीकांत यांना ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात, दादासाहेब फाळके पुरस्कारानं (Dadasaheb Phalke award) गौरवण्यात आलं. पुरस्कार स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणातून रजनीकांत यांनी अनेकांना मैत्रीची एक नवीन व्याख्या सांगितली. रजनीकांत यांनी भाषणामध्ये राज बहादूर यांचा उल्लेख केल्यानंतर त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली आहे. राज बहादूर नेमके कोण आहेत? याबाबत अनेकांचा मनात कुतुहल निर्माण झालं आहे.
सर्व डायहार्ट रजनी फॅन असलेल्यांना राज बहादूर हे नाव ओळखीचं आहे. बंगळुरूच्या चामराजपेट भागातील एका गल्लीत राहणारा एक साधा आणि नम्र माणूस, अशी बहादूर यांची ओळख आहे. राज बहादूर ही तिच व्यक्ती आहे जिनं एकेकाळच्या शिवाजीराव गायकवाडला 'रजनीकांत' बनण्यास प्रोत्साहन दिलं. त्यांनीच रजनीला अस्खलित तमिळ बोलायला शिकवलं. जे लोक रजनीकांत आणि राज बहादुर यांना ओळखतात ते त्यांच्या मैत्रीची तुलना महाभारतातील कृष्ण-सुदामाच्या (कुचेला) मैत्रीशी केल्याशिवाय राहत नाहीत. कारण, रजनी-राज यांची मैत्री देखील अगदी कृष्ण-सुदामा सारखीचं आहे. फरक फक्त इतकाचं आहे की रजनी-राजच्या गोष्टीमध्ये त्यांनी एकमेकांसाठी कधी कृष्णाची भूमिका निभावली तर कधी सुदामाची. दादासाहेब फाळके पुरस्कार मिळण्याच्या दोन आठवड्यांपूर्वीच रजनीकांत बंगळुरू येथे आपल्या जिवलग मित्राला भेटण्यासाठी गेले होते.
अशी झाली होती मैत्री
रजनीकांत आणि राज बहादुर यांची ५० वर्षांपासूनची मैत्री आहे, अशी माहिती खुद्द राज बहादुर यांनी न्यूज 18ला दिली. रजनी आणि राज यांची पहिली भेट 1970 मध्ये झाली होती. त्यावेळी रजनीकांत एक बस कंडक्टर होते तर राज बस ड्रायव्हर म्हणून ड्युटी करत. रजनीकांत वाहतूक कर्मचार्यांच्या गटातील सर्वोत्कृष्ट अभिनेता होते. बस आगारामध्ये होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये रजनीकांत रंगमंचावर आपलं अभिनय कौशल्य सादर करायचे. ड्युटी संपल्यानंतर देखील ते विविध नाटकांमध्ये सहभाग घेत, अशा शब्दांमध्ये राज बहादुर यांनी आपल्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. रजनीकांत हा सर्वोत्कृष्ट कलाकार होता आणि आहे, हे सांगायला देखील ते विसरले नाहीत.
आपल्या मित्रातील प्रतिभा ओळखून राज यांनी रजनीकांत यांना चेन्नईला जाऊन अभिनयाचं शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं. रजनीकांत यांनी आपल्या मित्राचा सल्ला ऐकला आणि त्यांनी दोन वर्षांचा अॅक्टिंग कोर्स पूर्ण केला. त्यानंतर एका संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात रजनीकांत यांनी आपलं अभिनय कौशल्य सादर केलं. प्रसिद्ध चित्रपट निर्माते के. बालचंदर त्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. त्यांनी रजनीकांतला तमिळ शिकण्याचा सल्ला दिला. ही बाब जेव्हा रजनीकांत यांनी राज बहादुर यांच्या कानावर घातली तेव्हा राज यांनी स्वत: त्यांना तमिळ भाषा शिकवली होती.
(हे वाचा:रणबीर-आलिया डिसेंबरमध्ये बांधणार लग्नगाठ? इटलीमध्ये पार पडणार सोहळा!)
या दोघांच्या मैत्रीबाबत आणखी एक गोष्ट आहे जी राज बहादुर स्वत: कधी सांगत नाहीत. मात्र, रजनीकांत यांनी अनेकदा ही गोष्ट जाहीरपणे सांगितलेली आहे. जेव्हा रजनीकांत चेन्नईमध्ये अभिनय शिकण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांच्याकडे पैसे नव्हते. मात्र, राज बहादुर यांनी आपल्या मित्राला कधी आर्थिक चणचण भासू दिली नाही. आपल्या 400 रुपये पगारातील 200 रुपये ते रजनीकांतला पाठवायचे. दर महिन्याला आपल्या पगारातील अर्धी रक्कम रजनीकांतला देण्याचं काम त्यांनी केलं. याचं पैशावर आपण चेन्नईतील 2-3 वर्षे काढली, असं रजनीकांत म्हणतात. राज बहादूर आता नोकरीतून निवृत्त झाले आहेत आणि आपल्या भावाच्या कुटुंबासोबत अतिशय साधेपणानं जीवन जगत आहेत.
रजनीकांत आता सुपरस्टार झाले आहेत. मात्र, त्यांच्या जिवलग मित्रासाठी आजही ते एक साधारण व्यक्तीचं आहेत. एक अशी व्यक्ती ज्याच्याशी ते आपल्या मनातील कुठलीही गोष्ट अगदी सहज बोलू शकतात. रजनीकांत नेहमी राज बहादूर यांना अचानक भेट देतात. जाण्यापूर्वी कुठलीही पूर्वकल्पना न देता अगदी सहजपणे ते भल्या पहाटे हक्कानं आपल्या मित्राच्या घराचा दरवाजा ठोठावतात. मित्राची अचानक येण्याची सवय माहीत असल्यानं राज बहादूर यांनी देखील आपल्या घरात रजनीकांत यांच्यासाठी एक स्वतंत्र खोली ठेवली आहे.
'तो जेव्हा माझ्या घरी येतो तेव्हा तो फक्त शिवाजी असतो. त्याला कर्नाटक आणि बंगळुरू खूप आवडतात. तो कधी येईल आणि दार ठोठावेल याची मला देखील कल्पना नसते. म्हणून त्याच्यासाठी एक खोली मी ठेवलेली आहे. ही एक साधी लहान खोली आहे ज्यामध्ये दोन व्यक्ती झोपू शकतात. जेव्हा रजनी घरी येतो तेव्हा आम्ही या खोलीमध्ये जाऊन तासन तास गप्पा मारतो,' असे राज बहादूर सांगतात. राज बहादूर कॉटवर झोपतात तर रजनी त्याच्या शेजारी जमिनीवर अंथरुण टाकून झोपतात. गेल्या अनेक वर्षांपासून ही गोष्ट अविरतपणे सुरू आहे. राज बहादूर यांचे कुटुंबीय देखील दोन मित्रांना एकमेकांच्या सहवासात मोकळेपणा देतात. अगदी शेजाऱ्यांना देखील रजनीकांत तिथे असल्याची कल्पना नसते.
(हे वाचा:HBD Anuradha Paudwal: लतादीदींसाठी ठरलेल्या चॅलेंज; या निर्णयामुळे संपलं करिअर)
आपल्या मित्राला भेटण्यासाठी रजनी जेव्हा बंगळुरूला येतात तेव्हा त्यांना रस्त्यावर फिरायला देखील मजा येते. रात्रीच्या काळोखात निजलेल्या बंगळुरू शहरातील वातावरणाचा आनंद घेणं रजनीकांत यांना आवडतं. अनेकदा विमानतळावरून राज बहादूर यांच्या घरी येताना ते थोडे दूर उतरतात आणि एकटेच फिरतात. एकदा रजनीकांत यांनी बंगळुरूतील बसवानगुडी येथे भरणाऱ्या शेंगदाण्याच्या वार्षिक जत्रेला (कडलेकाई परीशे) (Kadlekai Parishe) भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. राज बहादूर यांनी रजनीकांतचा वेष बदलून त्यांना गजबजलेल्या बुल टेम्पल रोडवर नेलं होतं. काही वेळ त्यांनी जत्रेत खरेदीचा आनंद देखील लुटला. मात्र, राज बहादूरच्या सोबत चालणारी व्यक्ती रजनीकांत असल्याचा एका मुलीला संशय आला. तिनं तसं या दोघा मित्रांना विचारलं देखील. त्यावर दोघांनी हसून तिचा प्रश्न टाळला. मात्र, ती मुलगी रजनीकांत यांची चाहती होती. रजनीच्या डोळ्यांवरून देखील त्यांना ओळखू शकते, असं तिचं म्हणणं होतं. शिवाय एका मुलाखतीमध्ये तिनं राज बहादूर यांच्याबद्दल देखील ऐकल्याचं सांगितलं. त्यानंतर मात्र, या दोघा मित्रांनी त्या मुलीची नजर चुकवून जत्रेतून धूम ठोकली, असा गमतीशीर किस्सा राज बहादूर यांनी सांगितला.
मित्राचा सल्ला लाख मोलाचा
राज बहादूर यांचा प्रत्येक शब्द रजनीकांत यांच्यासाठी महत्त्वाचा आहे. चित्रपट स्वीकारण्याचा, राजकारणात येण्याचा आणि नंतर माघार घेण्याचा निर्णय असो किंवा एखादी वैयक्तिक बाब असो, रजनीकांत राज बहादूर यांच्याशी सल्लामसलत केल्याशिवाय कोणताही निर्णय घेत नाहीत.
नोकरी करताना रजनी मॅजेस्टिक ते श्रीनगरदरम्यान धावणाऱ्या बस क्रमांक 10A चे कंडक्टर होते. ते हनुमंतनगरमध्ये रहायचे तर राज बहादूर चामराजपेटमध्ये. रजनी ग्राहकांना सुटे पैसे परत देताना ते स्टायलिशपणे फ्लिप करायचे आणि प्रवासादरम्यान त्यांचं मनोरंजन करायचे. तेव्हा प्रत्येक प्रवासात राज बहादूर त्यांच्यासोबत असायाचे. आज इतक्या वर्षांनंतरही 77 वर्षीय राज बहाद्दूर आणि रजनी यांनी एकमेकांची साथ सोडलेली नाही. जेव्हा सुपरस्टार रजनीकांत यांनी स्टेजवर स्वतःच्या कुटुंबाऐवजी आपल्या जिवलग मित्राचं नाव घेतलं तेव्हा त्यांच्यातील नातं किती उच्च दर्जाचं आणि घट्ट आहे हे साऱ्या जगानं पाहिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment