मुंबई, 17, एप्रिल : बॉलिवूडची क्वीन कंगना रानौतच्या 'मणिकर्णिका' सिनेमानंतर तिच्या चाहत्यांना 'मेंटल है क्या' सिनेमाची प्रतीक्षा होती. पण आता ही प्रतीक्षा अखेर संपली असून हा सिनेमा यावर्षी 21 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अभिनेता राजकुमार रावनं या सिनेमाचं नवं पोस्टर आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर करत याची माहिती दिली आहे. क्वीननंतर कंगना आणि राजकुमार पुन्हा एकदा 'मेंटल है क्या'सिनेमामध्ये एकत्र दिसणार आहेत. पोस्टरवर दिसत असल्याप्रमाणेच या संपूर्ण सिनेमातही राजकुमार पुन्हा एकदा वेगळ्या ढंगाच्या भूमिकेत दिसणार आहे.
'मेंटल है क्या'ची रिलीज डेट याआधी अनेकदा बदलण्यात आली. पण आता हा सिनेमा अखेर 21 जूनला बॉक्सऑफिसवर झळकणार होणार आहे. या सिनेमाचं शूटिंग नुकतचं संपलं असून यात कंगना आणि राजकुमारव्यतिरिक्त जिमी शेरगिल आणि अमायरा दस्तूर या दोघांच्याही भूमिका आहेत. जिमीनं याआधी कंगनासोबत 'तनु वेड्स मनु' सिनेमामध्येही काम केलं आहे. 'मेंटल है क्या'ची निर्मिती एकता कपूर करत असून सिनेमाची कथा मानसिक आरोग्य बिघडलेल्या लोकांच्या जीवनावर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे.
दरम्यान, कंगना रानौत आणि निर्माती एकता कपूर यांच्यात वाद सुरू असून या कारणामुळेच या सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेत अनेकदा बदल करण्यात आल्याचं बोललं जात होतं. पण कंगनाची बहीण रंगोलीनं कंगना आणि एकतामध्ये कोणताही वाद नसल्याचं सांगत ही फक्त अफवा असल्याचं एका मुलाखतीदरम्यान सांगितलं होतं. तसेच तिनं हा सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित होईल असंही म्हटलं होतं.
2019च्या सुरुवातीला रिलीज झालेला कंगना रानौतचा 'मणिकर्णिका' सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या सिनेमानं बॉक्सऑफिसवर चांगली कमाईदेखील केली. तसेच कंगनाच्या अभिनयाचंही कौतुक झालं. तर राजकुमार सोनम कपूरसोबत 'एक लडकी को देखा तो ऐसा लगा' आणि श्रद्धा कपूरसोबत 'स्त्री'मध्ये दिसला होता. याशिवाय त्याच्याकडे 'मेड इन चायना' हा सिनेमादेखील आहे. यामध्ये त्याच्यासोबत मोनी रॉयही मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
VIDEO : राष्ट्रवादीच्या तळावर सर्जिकल स्ट्राईक, प्रीतम यांचं धनंजय मुंडेंवर टीकास्त्र
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा