पाक सैन्यात मेजर होऊन हेरगिरी करणाऱ्या या 'रॉ' अधिकाऱ्यावर येतोय चित्रपट

पाक सैन्यात मेजर होऊन हेरगिरी करणाऱ्या या 'रॉ' अधिकाऱ्यावर येतोय चित्रपट

अभिनय आणि देशसेवेची प्रचंड आवड असलेल्या रविंद्र कौशिकांची रॉ गुप्तहेर ते पाकिस्तानी सैन्यात मेजर या थक्क करणाऱ्या जीवनावर एक नविन चित्रपट येतोय.

  • Share this:

16 मार्च,नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये दरवर्षी शेकडो चित्रपट प्रदर्शित होत असतात. या चित्रपटांपैकी मोजकेच चित्रपट हे सत्य घटनेवर आधारित असतात. 'नो वन किल्ड जेसिका' आणि 'रेड' असे दमदार चित्रपट तयार करणारे दिग्दर्शक राजकुमार गुप्ता आता पुन्हा एका सत्य घटनेवर आधारित चित्रपट तयार करणार आहेत. या आगामी चित्रपटाचे नाव 'इंडियाज मोस्ट वॉटेण्ड' असं आहे. हा चित्रपट आपल्या देशाची गुप्तहेर संघटना 'रॉ' चे धडाकेबाज हेर रविंद्र कौशिक यांच्या जीवनावर आधारीत आहे. या वर्षाच्या अखेरीस हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचं म्हटलं जात असलं तरी अजूनही निर्मात्याकंडून कोणतीही तारीख जाहीर झालेली नाही.

भारताची गुप्तहेर संघटना 'रॉ' ही जगातील सर्वात घातक संघटनेपैकी एक मानली जाते. जेव्हा- जेव्हा देशावर वाईट काळ आला तेव्हा जिगरबाज गुप्तहेरांनी जिवाची बाजी लावून शत्रू राष्ट्राची महत्वपूर्ण माहिती भारताला पुरवली. या महत्त्वपूर्ण माहितीच्या जोरावर शत्रू राष्ट्राचे अनेक काळे मनसुबे भारताने उडवून लावले. 'रॉ'चा इतिहास तुम्ही वाचाल तेव्हा रविंद्र कौशक नावाच्या जिगरबाज गुप्तहेराचे कर्तृत्व वाचून तुम्ही आश्चर्यचकीत व्हाल. आपल्या जिवाची पर्वा न करता देशाची सेवा करणाऱ्या याच जिगरबाज गुप्तहेराची जीवन कहाणी 'इंडियाज मोस्ट वॉटेड' या चित्रपटातून राजकुमार गुप्ता देशासमोर आणणार आहेत. त्याकरता त्यांनी रविंद्र कौशिक यांच्या कुटुंबाची परवानगी घेतली आहे.

कोण होते रविंद्र कौशिक?

अभिनयाच्या माध्यमातून स्वत:ची ओळख निर्माण करायचं ध्येय उराशी बाळगलेल्या तसेच देशाची सेवा करण्याची प्रचंड इच्छा असलेले रविंद्र हे एक सामान्य तरूण होते. एक होतकरू कलाकार आणि स्वत:च्या वेगळ्या शैलीमुळे ते कॉलेजमध्ये प्रचंड प्रसिद्ध होते. तत्कालीन काळात 'रॉ'ला गुप्तहेरांची गरज होती. यासाठी रॉचे अधिकारी चांगल्या हुशार आणि अष्टपैलू तरूणांच्या शोधात होते. रॉ अधिकाऱ्यांची रविंद्र यांच्यावर नजर होती. जेव्हा रविंद्र गुप्तहेर होऊ शकतात ही खात्री त्यांना पटली तेव्हा रविंद्र यांना रॉमध्ये भरती करून घेतले. त्यांना योग्य प्रशिक्षण देऊन पाकिस्तानात पाठवले. या सर्व काळात रविंद्र यांनीही अफाट मेहनत घेतली. त्यांचे खतनाही करण्यात आले होते. गुप्तहेर होऊन देशाची सेवा करायला मिळणार या गोष्टीमुळे ते प्रचंड खुष होते. रविंद्र यांची 'रॉ'कडून पाकिस्तानमध्ये राहण्याची संपुर्ण व्यवस्था केली गेली होती. रविंद्र यांनी पाकिस्तानात गेल्यावर कराची विद्यापीठात शिक्षण घेतलं. शिवाय पाकिस्तानी सैन्यात भरती होऊन मेजर पदापर्यंत पोहोचले. 1979 ते 1983 पर्यंत त्यांनी स्वतःच्या हुशारीच्या जोरावर पाकिस्तानी सैन्यातील महत्वपुर्ण माहिती 'रॉ'ला पुरवली.

इंदिरा गांधींनी दिला होता ब्लॅक टायगरचा किताब

दरम्यानच्या काळात रविंद्र कौशिक एका पाकिस्तानी मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी लग्नही केलं. शत्रू देशात राहून तिथे संसार थाटणं ही अशक्य गोष्ट मोजक्याच गुप्तहेरांना जमते आणि ते रविंद्र यांनी करून दाखवलं होतं. रविंद्र कौशिक यांनी पाठवलेल्या माहितीच्या जोरावर पाकिस्तानने भारताविरुद्ध रचलेले नापाक कारस्थानं भारताने उडवून लावली होती. या महत्त्वपूर्ण कामगिरीसाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रविंद्र यांना ब्लॅक टायगर हा किताब दिला होता. 1983 ला भारत एका नवीन गुप्तहेराला पाकिस्तानात पाठवते. दुर्दैवाने त्या हेराला पाकिस्तानी गुप्तहेर संघटना पकडते. तपासामध्ये तो रविंद्र कौशिक यांच्याबद्दल सर्व माहिती सांगतो आणि मग रविंद्र कौशिक यांना कैद केली जाते. यानंतर जीव वाचवण्यासाठी रविंद्र रॉकडे मदत मागतात. पण, दुर्दैवाने रविंद्र यांना कोणतीच मदत मिळत नाही. अखेर 2001 मध्ये मियांवली तुरूंगात रविंद्र कौशिक यांचा क्षयरोग आणि हृदयरोगामुळे मृत्यू होतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 16, 2019 06:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading