चैन्नई, २० एप्रिल- दाक्षिणात्य सिनेसृष्टीचे मेगास्टार रजनीकांत यांनी ते आगामी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं म्हटलं. त्यामुळेच त्यांच्या नावाचा वापर करून प्रचार न करण्याची विनंती रजनीकांत यांनी सर्व पक्षांना केली.
शुक्रवारपासून दरबार सिनेमाच्या चित्रीकरणासाठी ते मुंबईत आले. मुंबईला रवाना होण्याआधी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन याबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी रजनीकांत म्हणाले की, ‘जेव्हाही घोषणा होतील तेव्हा मी विधानसभा निवडणूक नक्कीच लढवेन. मी माझ्या समर्थकांना निराश करणार नाही.’ रजनीकांत यांनी ते राजकारणात प्रवेश करणार असल्याचा खुलासा आधीच केला होता.
लोकसभा निवडणुकांच्या दुसऱ्या फेरीत झालेल्या मतदानाबद्दल ते समाधानी असल्याचं सांगितलं. ते म्हणाले की, ७१.८७ टक्के मतदान होणं ही फार चांगली गोष्ट आहे. नरेंद्र मोदी दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार की नाही या प्रश्नाचं उत्तर देताना ते म्हणाले की, याचा निर्णय २३ मे रोजीच होईल.