'वावटळीतही इरफान टिकून राहिला', राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

'वावटळीतही इरफान टिकून राहिला', राज ठाकरेंनी वाहिली श्रद्धांजली

प्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांच्या निधनानंतर कलाकारांसह राजकीय, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनी श्रद्धांजली वाहिली.

  • Share this:

मुंबई, 29 एप्रिल : प्रसिद्ध अभिनेता इरफान खान यांचे कर्करोगाने निधनं झालं. मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हरहुन्नरी आणि चतुरस्र अभिनेत्याच्या निधनानंतर कलाकारांसह राजकीय, उद्योग क्षेत्रातील मान्यवरांनीही श्रद्धांजली वाहिली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे. इरफान खान याचा सहज सुंदर अभिनय, संवाद फेक आणि पडद्यावर एक माणूस म्हणून असलेला त्याचा वावर याबाबत राज ठाकरे यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.

गेल्या दोन वर्षांपासून इरफान खान कॅन्सरशी झुंज देत होता. अखेर बुधवारी त्याची ही झुंज संपली. Colon Infection झाल्यामुळे त्याला मंगळवारी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.वर्सोव्यातील कब्रस्तानमध्ये दुपारी 3 वाजता दफनविधी पार पडला. यावेळी घरातील काही निवडक सदस्य उपस्थित होते.

राज ठाकरे यांची पोस्ट

शरीर सौष्ठव, चकचकीत चेहरा, नृत्याचं अंग नसलं तरी पडद्यावर जे अंगविक्षेप केले जातील त्याला नृत्य म्हणणं आणि अतर्क्य दिसणाऱ्या, वागणाऱ्या खलनायकांना संपवण्यासाठी अतर्क्य गोष्टी करणाऱ्या बॉलिवूड मधल्या नायकांचा काळ सुरु असताना इरफान खान सिनेमात भूमिका मिळाव्यात म्हणून धडपडत होता. त्याची अभिनयाची सहज-सुलभता नसिरुद्दीन शाह, ओम पुरी आणि अजून मागे गेलं तर बलराज सहानी ह्यांच्या पठडीतली. पण ९० च्या दशकात मुळात हिंदी चित्रपट आणि अभिनय ह्यांच्यात फारकत असण्याचा काळ होता. ह्या वावटळीत पण इरफान इथे टिकून राहिला.

पुढे नव्या शतकात सिनेमातले अतर्क्य खलनायक मागे पडले आणि माणसातील उणिवा, महत्त्वाकांक्षा, ह्याही माफक का होईना खलनायकी असू शकतात ह्याची जाणीव नव्या दिग्दर्शकांना होत होती आणि त्यातून इरफानची ‘मकबूलीयत’ सुरु झाली. हिंदी चित्रपटसृष्टीच्या साचेबद्ध यशस्वी नटांच्या पठडीतलं आपल्याकडे काही नव्हतं ह्याची जाणीव इरफानला असावी आणि त्याची उणीव त्याने संवाद फेकीने, डोळ्यातून व्यक्त होण्याच्या ताकदीने भरून काढली. एखादं किडकिडीत व्यक्तिमत्व पण पडदा व्यापून टाकू शकतं, हे इरफानने दाखवून दिलं. सहज अभिनयाची परंपरा हिंदी चित्रपटसृष्टीत इरफानने प्रवाहित ठेवली.

हे वाचा : 'अम्मा मला नेण्यासाठी आली आहे', इरफान खानचे हृदय हेलावून टाकणारे शेवटचे शब्द

इरफान लक्षात राहील कारण पडद्यावर तो वावरताना आपल्यातला प्रत्येक माणूस स्वतःला त्याच्याशी एकरूप करू शकायचा. ही एकरूपताच इरफानला दीर्घकाळ स्मरणात ठेवेल. माझ्या पक्षाची चित्रपट शाखा कलाकारांसाठी प्रामाणिकपणे काम करते, हेच इरफानना भावलं असणार आणि म्हणून त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचा सदस्यत्व स्वीकारलं असणार. अशा ह्या चतुरस्त्र अभिनेत्यास आणि सहकाऱ्यास भावपूर्ण श्रद्धांजली.

हे वाचा : ...म्हणून इरफाननं वगळलं होतं आपल्या नावातून 'खान' आडनाव

संपादन - सूरज यादव

First published: April 29, 2020, 8:35 PM IST
Tags: Irfan Khan

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading