मुंबई, 18 सप्टेंबर : 'गोड संसारासाठी थोडं तिखट व्हावं लागतं' असं म्हणत जवळपास २ वर्षांपूर्वी सुरू झालेली 'माझ्या नवऱ्याची बायको' ही मालिका रसिकप्रेक्षकांच्या मनावर अक्षरशः राज्य करतेय. आजवर टीआरपीचे नवे उच्चांक या मालिकेने प्रस्थापित केले आहेत. आपल्या नवऱ्यावर मनापासून प्रेम करणारी, 'स्वावलंबी' राधिका, राधिकाच्या नवऱ्याला आपल्या तालावर नाचवणारी 'नखरेल' शनाया आणि राधिका-शनायाच्या कचाट्यात सापडलेला 'बिचारा' गुरुनाथ, या तिघांची अफलातून केमिस्ट्री हेच या मालिकेच्या यशाचं गमक आहे.
नुकतंच मालिकेत नवीन शनायाची एंट्री झाली आणि त्यामुळे मालिका अजूनच रंजक बनत चालली आहे. शनाया राधिकाचा बदल घेण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत आहे नुकतंच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिलं की शनायाच्या अशाच एका चालीमुळे राधिकाचा अपघात झाला. राधिका शनायामुळे तिच्या जीवाला मुकणार का? तर आगामी भागात प्रेक्षक पाहू शकणार आहेत की राधिका तिच्या अपघातामुळे कोमामध्ये जाणार आहे आणि त्यामुळे राधिकाच्या जीवाला धोका निर्माण होणार आहे.
त्याबद्दल प्रेक्षकांना काय वाटतंय? स्वत: व्यावसायिक असलेल्या ज्योती पालेकर म्हणाल्या, 'छोटा व्यवसाय करणारी राधिका आता दोन कंपन्यांची मालकीण आहे, हे काही फारसं पटत नाही. इतक्या गतीनं हा प्रवास होणं कठीण. शिवाय आता राधिका गुरूनाथ आणि शनायाला आॅफिसमध्ये जी वागणूक देते तीही चुकीचीच आहे. असं कोणी कधी करत नाही.' राधिका आता कोमात जाणार, हा त्या कथेत आणलेला भाग असू शकेल. नवी शनाया चांगलं काम करते, असं ज्योतीताईंचं म्हणणं आहे.
ठाण्याला राहणाऱ्या नीता नामजोशी म्हणाल्या, 'राधिकाला कोमामध्ये दाखवून काय साधणार? उलट राधिकाच मालिकेची नायिका आहे. चॅनेलनं दाखवलेलं हे धक्कातंत्र चुकीचं ठरू शकतं. पुन्हा नवी शनायाही अजून तेवढी लोकांच्या मनात ठसली नाहीय. त्यामुळे एक तर जुनी शनाया नाही आणि राधिका कोमात. प्रेक्षकांना धरून ठेवायला कोण राहणार आता?'
आता राधिकाच्या गैरहजेरीत तिच्या ऑफिसचं कामकाज कोण पाहणार? तिच्या अपघातामुळे शनायाला तिच्या वागण्याचा पश्चाताप होणार का? गुरुनाथला खरंच त्याच्या चुकांची जाणीव होऊन तो राधिकाच्या काळजी घेणार का? या सगळ्यांची उत्तर लवकरच मिळतील, अशी आशा करू.
VIDEO: तरुणीने भर रस्त्यात मित्रावर केले चाकूने वार
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mazya navryachi bayako, Radhika, Shanaya, माझ्या नवऱ्याची बायको, राधिका, शनाया