राज्य सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार' गायिका पुष्पा पागधरे यांना घोषित

राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा २०१६-१७ चा पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका श्रीमती पुष्पा पागधरे यांना आज मुंबई येथे घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2017 03:11 PM IST

राज्य सरकारचा 'लता मंगेशकर पुरस्कार' गायिका पुष्पा पागधरे यांना घोषित

मुंबई २८ सप्टेंबर : राज्य शासनातर्फे संगीत क्षेत्रात  गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या नावे दिला जाणारा २०१६-१७ चा पुरस्कार यंदा ज्येष्ठ गायिका श्रीमती पुष्पा पागधरे यांना आज मुंबई येथे घोषित करण्यात आला. सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

प्रतिवर्षी राज्य शासनातर्फे गायन व संगीत क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या कलाकारास गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या पुरस्काराचे स्वरुप रु.५ लाख रोख, मानपत्र, सन्मानचिन्ह असे आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे यांच्या अध्यक्षतेखालील समितीने या पुरस्कारासाठी ज्येष्ठ गायिका पुष्पा पागधरे यांच्या नावाची शिफारस केली आहे. यापूर्वी हे पुरस्कार श्रीमती माणिक वर्मा, श्रीनिवास खळे, गजानन वाटवे, दत्ता डावजेकर, पं.जितेंद्र अभिषेकी, पं.हदयनाथ मंगेशकर, ज्योत्स्ना भोळे, आशा भोसले, अनिल विश्वास, सुधीर फडके, प्यारेलाल शर्मा,रवींद्र जैन, स्नेहल भाटकर, मन्ना डे, जयमाला शिलेदार, खय्याम, महेंद्र कपूर, सुमन कल्याणपूर, सुलोचना चव्हाण, यशवंत देव, आनंदजी शहा, अशोक पत्की, कृष्णा कल्ले, प्रभाकर जोग, उत्तम ब्रिदपाल सिंग यांना प्रदान करण्यात आला आहे.

पुष्पा पागधरे यांचा जन्म १५ मार्च १९४३ रोजी झाला, त्यांना संगीताचे धडे लहानपणी त्यांचे वडील जनार्दन चामरे यांच्याकडून मिळाले. पुष्पाताईंनी त्यांचे गुरु श्री .आर.डी.बेंद्रे यांच्याकडून शास्त्रीय संगीत आणि राग रागीनी यांचे शिक्षण घेतले त्यानंतर मुंबईत्‍ येऊन गीत, गझल, भजन आणि ठूमरी हे सुगम संगीत घेण्यास सुरवात केली. पुष्पाताई आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत. प्रसिदध संगीतकार राम कदम यांनी त्यांना प्रथम देवा तुझी सोन्याची जेजुरी या चित्रपटात गायनाची संधी दिली. बाळ पळसुले, सुधीर फडके, श्रीनिवास खळे, प्रभाकर पंडित, डी.एस.रुबेन, विठठल शिंदे, राम-लक्ष्मण, विश्वनाथ मोरे, यशवंत देव इत्यादी अनेक प्रसिदध संगीतकारांच्या चित्रपटांमध्ये त्यांना गायनाची संधी मिळाली.

पुष्पाताईंना दोन वेळा राज्य शासनाच्या पुरस्कार सोहळयात पार्श्वगायिकेची पारितोषिके मिळाली आहेत. पुष्पाताईंनी खून का बदला, बिना माँ के बच्चे, मुक्कदर का सिकंदर अशा अनेक चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत. त्याचबरोबर अंकुष चित्रपटातील सुप्रसिद्ध गीत इतनी शक्ती हमे दे ना दाता हे त्यांनी गायले आहे. तसेच त्यांनी मराठी, भोजपुरी, ओडिया, बंगाली,मारवाडी, हरियानवी, पंजाबी, गुजराती आणि आसामी भाषांमध्ये गाणी गायली आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 03:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...