22 मे : देसी गर्ल प्रियांका चोप्राचा 'बेवॉच' हा पहिलावहिला हॉलिवूड सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मात्र त्याअगोदरच आपल्या सेंसॉर बोर्डाने या सिनेमाला कात्री लावलीय. प्रियांकाच्या या सिनेमाला सेंसॉर बोर्डाकडून 'ए' सर्टिफिकेट दिलं गेलंय. म्हणजेच आता लहान मुलं हा सिनेमा पाहू शकणार नाहीत. या सिनेमात एकूण पाच कट करण्यात आलेत.
कापण्यात आलेल्या दृश्यांत प्रियांकाच्या बिकनी सीन्सचाच समावेश असल्याचं बोललं जात होतं. मात्र आता याबाबत खुद्द सेंसॉर बोर्डाचे अध्यक्ष असलेल्या पहलाज निहलानी यांनीच खुलासा केलाय. ते म्हणालेत की, सिनेमाला 'ए' सर्टिफिकेट देण्याचं कारण हे बिकनी सीन्स नसून या सिनेमातले वादग्रस्त डायलॉग्ज हे आहे. 'प्रियांकाच्या कोणत्याही बिकनी सीनला हटवलं नाही, कारण याआधीही भारतीय सिनेमांत अशा प्रकारची दृश्यं दाखवण्यात आली आहेत,'असंही निहलानी पुढे म्हणालेत.
सध्यातरी प्रियांका याच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचा कंटेंट लहान मुलांसाठी योग्य नाहीय, हे प्रियांकाने याअगोदरच स्पष्ट केलंय.
'बेवॉच' अमेरिकेत 25 मे रोजी रिलीज होईल. तर भारतीय सिनेमागृहांत प्रेक्षकांना 2 जूनपासून या सिनेमाचा आस्वाद घेता येईल.