मुंबई, 20 सप्टेंबर : अभिनेत्री प्रियांका चोप्रा एक गुणी अभिनेत्री आहे. तिचा अभिनय तर दमदार असतोच पण त्याशिवाय ती अनेक सामाजिक कामांमध्ये देखील सहभागी होते. तसंच अनेक विषयांवर आपले मत ती मांडत असते. नुकतेच प्रियांका चोप्राने न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेत भाषण केले. यादरम्यान तिने विविध विषयांवर प्रकाश टाकला. यावेळी मलाला युसुफझाई आणि अमांडा गोरमन या जागतिक नेत्यांसोबत तिने भाषण केले. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत तिने याविषयी माहिती दिली आहे.
प्रियांका चोप्रा 2016 मध्ये युनिसेफची ग्लोबल सदिच्छा दूत बनली. या संस्थेशी ती दीर्घकाळापासून जोडलेली आहे. या कॉन्फरन्सशी संबंधित अनेक फोटो आणि व्हिडीओ प्रियंकाने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या परिषदेचा भाग होण्याची संधी मिळाल्याबद्दल तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्र महासभेत केलेल्या भाषणामध्ये प्रियंकाने 'आपल्या जगात सर्व काही ठीक नाही' असे मत नोंदवले आहे. तिच्या या विधानाची आता चर्चा होतेय.
View this post on Instagram
प्रियंकाने शेअर केलेल्या एका क्लिपमध्ये ती म्हणत आहे कि, "आपण आज एका महत्त्वपूर्ण टप्प्यावर भेटत आहोत जेव्हा जागतिक नेहमीपेक्षा अधिक महत्व आहे. जग सध्या नैसर्गिक संकटं आणि कोविड-19 च्या विनाशकारी परिणामांशी झुंजत आहे. संघर्ष, गरिबी, उपासमार आणि असमानता ही चिंता सगळ्या जगाला सतावत आहे. त्यामुळेच जगात सर्व काही ठीक नाही. पण ही संकटे अचानक आली नाहीत, ती योजना आखून सोडवता येतील. ती योजना युनायटेड नेशन्स सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स यांच्याकडे आहे."
हेही वाचा - Ayushmann Khurrana : आयुष्मानचा ‘डॉक्टर जी' येतोय प्रेक्षकांच्या भेटीला; चित्रपटाचे धमाकेदार पोस्टर रिलीज
तिच्या संबोधनात प्रियंका म्हणाली, "मी भारतात लहानाची मोठी झाले, जिथे जगातील इतर अनेक भागांप्रमाणेच अनेक मुलींसाठी शिक्षण मिळवणे हे आव्हान आहे. जिथे मुलांना शिकायचे आहे, तसे करण्याची शक्ती त्यांच्यात आहे. परंतु त्यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. माझा विश्वास आहे की शिक्षण हा समता, सामाजिक न्याय, सामाजिक परिवर्तन आणि लोकशाहीचा आधार आहे.''
प्रियंकाने या परिषदेत भारताचे प्रतिनिधित्व करून जागतिक स्तरावर महत्वाचे सामाजिक मुद्दे मांडले. प्रियांकाच्या चाहत्यांसाठी ही अभिमानास्पद बाब आहे. तिचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Priyanka chopra