हेमलकसातल्या सीतेनं कसलाच मोह धरला नाही, प्रकाश आमटेंनी सांगितलं संसाराचं गुपित

डाॅ. प्रकाश आमटे आणि डाॅ. मंदाकिनी आमटे या असामान्य जोडीची असामान्य संसारगाथा रसिकांना अनुभवता येणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Feb 20, 2019 04:21 PM IST

हेमलकसातल्या सीतेनं कसलाच मोह धरला नाही, प्रकाश आमटेंनी सांगितलं संसाराचं गुपित

मुंबई, 20 फेब्रुवारी : नवऱ्याने पत्नीसाठी कधीही साडी खरेदी केली नाही, की कधी कुठला दागिना आणला नाही. तरीही पत्नी म्हणत असेल 'नवरा असावा तर असा' किंवा जन्मोजन्मी हाच नवरा हवा तर ती स्त्री कुणी सामान्य स्त्री नसते, तर ती असते एक असामान्य व्यक्ती. ते दाम्पत्य असतं, समाजसेवेचं व्रत हाती घेतलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ प्रकाश आमटे आणि डॉ मंदाकिनी आमटे.

तीनशे पंच्याहत्तर भागांचा टप्पा पार केल्यानंतर कलर्स मराठी वरील 'नवरा असावा तर असा' कार्यक्रमाच्या विशेष भागात या व्रतस्थ दाम्पत्याची भेट घडणार आहे. आणि या असामान्य जोडीची असामान्य संसारगाथा रसिकांना अनुभवता येणार आहे.

डॉ. मंदाकिनींशी झालेली पहिली भेट, नंतर दोघांच्या मैत्रीचं प्रेमात झालेले रूपांतर, आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असणाऱ्या मुलीशी पत्रिका, मुहूर्त, मानपान या सगळ्या गोष्टी बाजूला सारून आनंदवनात कुष्ठरोगी व्हराडी- वाजंत्रीच्या साथीने उडालेला लग्नाचा बार या सगळ्या आठवणी डॉ  प्रकाश आमटे - डॉ मंदाकिनी आमटे यांनी 'नवरा असावा तर असा'मध्ये जागवल्या.

आनंदवनातून हेमलकसात कसे आलो, हेमलकसात आलो तेव्हा लोक आम्हाला हेमलकसाचे 'राम - सीता' म्हणायचे. रामायणातील राम सीता वनवासात गेले तेव्हा सीतेला कस्तुरीमृगाचा मोह तरी झाला पण हेमलकसातल्या या सीतेने कशाचाही मोह धरला नाही, असे गौरवोद्गार  मंदाताईंबद्दल बोलताना प्रकाश आमटे काढतात. तर सुखी संसारासाठी प्रेमापेक्षाही विश्वास अधिक हवा. आमचीही छोटी भांडणं, रुसवेफुगवे होतात,नाही असं नाही. पण भांडण वाढायला नको म्हणून मीच माघार घेते, अशी प्रांजळ कबुलीही मंदाताई देतात.

'जीवनात ही घडी अशीच राहू दे' हे आपलं आवडतं गाणं आहे, असं सांगत प्रकाशभाऊ म्हणतात की, लग्नाला ४७ वर्षे लोटली तरी पत्नीसाठी खरंच कधी साडी किंवा दागिना मी घेऊन नाही दिला आणि तिनेही कधी मागणी केली नाही. यावर खरेदी किंवा बाजारहाट यात डॉ प्रकाश यांना कधीही रस नव्हता , त्यामुळे मलाही कधी त्यांनी आपल्यासाठी काही आणलं नाही, याचं मुळीच वाईट वाटलं नाही.  आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्याचा गर्व वाटण्यापेक्षा आपल्याकडे जे नाही, त्याचा आनंद आम्हाला नेहमीच जास्त वाटला, असं दोघंही कबूल करतात.

Loading...

असामान्य, कर्तृत्ववान जोडीचा प्रवास, गेल्या पाच दशकात वाढलेली त्यांची लोकबिरादरी, सुमारे दीडशे प्राण्यांबरोबरचा त्यांचा कुटुंबकबिला, समाजसेवेचं व्रत घेतलेली त्यांची तिसरी पिढी या सगळ्याविषयी जाणून घेता येणार आहे.


पाठकबाईंच्या निवडणुकीत प्रचाराची नवी 'हवा'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 20, 2019 04:21 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...