मुंबई, 26 जानेवारी- बॉलिवूड किंग अर्थातच अभिनेता शाहरुख खानने तब्बल 4 वर्षानंतर पडद्यावर पुनरागमन केलं आहे. हा क्षण त्याच्या चाहत्यांसाठी फारच खास आहे. देशभरात 'पठाण'ची धूम दिसून येत आहे. पठाण रिलीज होताच शाहरुखचे चाहते एखाद्या उत्सवासारखं सेलिब्रेट करताना दिसून येत आहेत. सोबतच थिएटर्समधून बाहेर येणाऱ्या चाहत्यांकडून चित्रपटाबाबत अनुकूल प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. बॉलिवूड सेलेब्रेटींनीसुद्धा या चित्रपटाचं कौतुक करत फर्स्ट डेला हजेरी लावली आहे. दरम्यान अभिनेत्री कंगना रनौतनेसुद्धा शाहरुख खानच्या पठाणचं तोंडभरुन कौतुक केलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला 'पठाण' चित्रपट काल रिलीज झाला आहे. या चित्रपटाने रिलीजपूर्वीच ऍडव्हान्स बुकिंगचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले होते. त्यांनतर प्रत्येकालाच चित्रपटाच्या रिलीजची उत्सुकता लागून होती. काल चित्रपट रिलीज झाल्यानंतर अनेक थिएटर्समध्ये अफाट गर्दी आणि जल्लोष पाहायाला मिळाला होता. अनेक ठिकाणी चित्रपटाला विरोध करण्यात आला होता शोसुद्धा बंद पाडण्यात आले होते. परंतु प्रेक्षकांच्या मागणीनुसार हे शो पुन्हा सुरु करण्यात आल्याचं समोर आलं होतं.
(हे वाचा: Pathaan Movie: शाहरुख खानचा 'पठाण' रिलीजच्या पहिल्याच दिवशी लिक; या वेबसाईट्सवर दिसतोय सिनेमा)
दरम्यान बॉलिवूड सेलेब्रेटींसाठी चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवशी स्पेशल स्क्रिनींग ठेवण्यात आलं होतं. यामध्ये हृतिक रोशनपासून ते सलमान खानपर्यंत अनेक मोठमोठ्या कलाकारांनी हजेरी लावली होती. विशेष म्हणजे बॉलिवूडवर नेहमीच घणाघात करणारी अभिनेत्री कंगना रणौतसुद्धा पठाणबाबत बोलताना दिसून आली. नुकतंच कंगनाला शाहरुख खानच्या चित्रपटाबाबत विचारण्यात आलं होतं. ज्याला अभिनेत्रीने स्पष्ट उत्तर दिलं आहे.
View this post on Instagram
पठाणबाबत प्रतिकिया देताना कंगना रणौतने म्हटलं, 'पठाण चित्रपट चांगलं काम करत आहे... असे चित्रपट खरंच चालायला हवे... खासकरुन हिंदी सिनेमे मागे पडत आहेत. त्यामुळे लोकांनी त्या लेव्हलला जाणून प्रयत्न करायला हवेत'. कंगनाची ही प्रतिक्रिया सध्या जोरदार व्हायला होत आहे. नेहमीच बॉलिवूडशी पंगा घेणारी कंगना शाहरुखच्या चित्रपटाचं कौतुक करत आहे हे पाहून सर्वांच्याच भुवय्या उंचावल्या आहेत.
काहींनी कमेंट करत 'ताईने चांगलीच पलटी मारली' असं लिहलंय. तर काहींनी हे कधी घडलं असं म्हणत कंगनाची थट्टा केली आहे. तर काहींनी कंगनाचं बॉलिवूडकरांसोबत पुन्हा सूत जुळत असल्याचं म्हटलं आहे. कंगना रणौतचा या व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.