मुंबई, 17 डिसेंबर : 'निश:ब्द', 'गजनी' फेम अभिनेत्री जिया खान (Jiah Khan)अनेकांना आठवत असेल. एकाएकी केलेल्या आत्महत्येमुळे (suicide) ती चर्चेत आली होती. आता तिच्या आत्महत्येसंदर्भाने अजून एक नवी घडामोड समोर आली आहे. जिया खानने 2013 साली आत्महत्या केली होती. त्यानंतर तिची आई राबिया खान यांनी जिाच्या आत्महत्येला कारणीभूत ठरले म्हणून अभिनेता आदित्य पांचोलीच्या कुटुंबीयांवर आरोप केले होते. आता आदित्य पांचोली, त्यांची पत्नी अभिनेत्री झरीना वहाब आणि मुलगी सना पांचोली हे तिघे मुंबई हायकोर्टात गेले आहेत. सूरज पांचोली आणि जिया खान यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यावरूनच झालेल्या मतभेदातून जियाने टोकाचं पाऊल उचलल्याचे आरोप आहेत.
या तिघांची राबिया यांच्याविरुद्ध कोर्टात जाण्याची खरंतर ही पहिलीच वेळ नाही. राबिया यांना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी जबाबदार धरलं जावं या मागणीसाठी त्यांनी याआधीही बऱ्याचदा कोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. राबिया या तिघांबाबत सतत बदनामीकारक विधानं करत असल्याची त्यांची तक्रार आहे. 2011 ते 2015 मध्ये, तीन वेळा मुंबई उच्च न्यायालयानं राबिया यांना पांचोली कुटुंबाबत अशी विधानं न करण्याबाबत समज दिली होती. 2017 मध्ये मुंबई हाय कोर्टासमोर उपस्थित राहत राबिया यांनी सांगितलं होतं, की यापुढं त्या अशी विधानं करणार नाहीत आणि पांचोली कुटुंबियांची बदनामी करणारी प्रेस रिलीजेस अथवा मुलाखती बंद करतील.
पांचोली यांची याचिका काय म्हणते?
आता पांचोली यांनी फाईल केलेली याचिका सांगते, की कोर्टाच्या अंतरिमकालीन आणि अंतरिम आदेशाची माहिती असून आणि कोर्टासमोर अशी काही विधानं न करण्याचं लेखी कबूल करूनही राबिया खान यांनी पुन्हा बदनामीकारक विधानं करणं सुरूच ठेवलं आहे. ट्विटर, युट्युब आणि इतरही सोशल मिडीया प्लॅटफॉर्म्सवर त्या असी विधानं करत आहेत.'
पांचोली कुटुंबीय म्हणाले, की सुशांत सिंग राजपुतच्या मृत्यूनंतर राबिया यांनी पुन्हा आमच्यावर शाब्दिक हल्ले सुरू केलेत. पांचोली यांचे वकील प्रशांत पाटील यांनी दाखल केलेल्या याचिकेत युट्युब, ट्विटर आणि वृत्त वाहिन्यांच्या अनेक लिंक्य जोडलेल्या आहेत. याचिचेत हेसुद्धा सांगितलंय, की राबिया यांनी Fightforjiah@jiahkhanjustice नावानं नवं ट्विटर खातं सुरू केलं आहे. याचे 22000 फॉलोअर्स असून, यावरून सतत ट्विट्स केली जातात. 'राजकीय वरदहस्त असलेल्या बॉलिवुडमाफिया वडिलांनी सीबीआयला मॅनेज केलं असून ते कधीच सत्य बाहेर येऊ देणार नाहीत' अशी ही ट्वीट्स आहेत.
या याचिकेवर पुढील आठवड्यात सुनावणी अपेक्षित आहे. राबिया यांनी विविध माध्यमांतून केलेली बदनामीकारक विधानं मागे घ्यावीत असं याचिकेत म्हटलं आहे.
झरीना वहाब आणि आदित्य पांचोली यांचा मुलगा, सूरज पंचोली आणि जिया खान यांचे कथितरित्या प्रेमसंबंध होते. त्यातून तिने आत्महत्या केली असे तपासातून समोर आले होते. सूरज पांचोलीवर पूर्वीच गुन्हा दाखल झालेला असून खटल्याची सुनावणी सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Suicide, The Bombay High Court