'पद्मावती' ट्रेलरचं साम्य 'बाहुबली' आणि 'बाजीराव मस्तानी'शी.

'पद्मावती' ट्रेलरचं साम्य 'बाहुबली' आणि 'बाजीराव मस्तानी'शी.

तुर्तास कितीही तुलना केली तरीही कमीच पडावी एवढं साम्य या तीन सिनेमांच्या ट्रेलरमध्ये दिसतंय. प्रेक्षकांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटलं नसल्याने सोशल मीडियावर याची चर्चाही सुरू झालीय.

  • Share this:

विराज मुळे, 11 आॅक्टोबर : पद्मावती या सिनेमाचं ट्रेलर रिलीज झाल्यापासून या ट्रेलरची तुलना बाकीच्या मोठ्या सिनेमांच्या ट्रेलरशी व्हायला लागलीय. कुणी या सिनेमाची तुलना बाहुबली द कनक्लुजनच्या ट्रेलरशी केलीय. तर कुणी या सिनेमाची तुलना भन्साळी यांच्याच बाजीराव मस्तानी या सिनेमाच्या ट्रेलरशी केलीय.

पद्मावती या सिनेमाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला.या सिनेमाची भव्यदिव्यता पाहून या सिनेमाचा ट्रेलर अल्पावधीतच टॉप ट्रेंडिंग ठरला. या ट्रेलरला कोट्यवधींचे व्ह्यूज मिळाले.राणी पद्मावती बनलेल्या दीपिकाचं सौंदर्य...राजा रावल रतन सिंगच्या भूमिकेतल्या शाहीद कपूरचा राजेशाही थाट आणि अल्लाउद्दीन खिलजीच्या भूमिकेतल्या रणवीर सिंगचा क्रूरपणा, पाहता क्षणी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडला. प्रत्येक सीनमध्ये दाखवण्यात आलेली भव्यदिव्यता, युद्धाचे प्रसंग, आणि कॅमेरा टेक्निक्सचा वापर डोळे दिपवून टाकणारा आहे. मात्र तरीही हा ट्रेलर पाहिल्यावर राहून राहून हे सारं आधी कुठेतरी पाहिल्याची भावना प्रेक्षकांच्या मनात येते आणि त्यामुळेच या ट्रेलरची इतर मोठ्या सिनेमांच्या ट्रेलरशी तुलना सुरू होते.

सगळ्यात आधी सुरुवात करूयात ट्रेलरच्या पहिल्याच सीनमध्ये दिसणाऱ्या चित्तुरच्या किल्ल्याच्या दृष्यापासून. हाच किल्ला बाजीराव मस्तानी या सिनेमाच्या बुंदेलखंडातील राजाच्या किल्ल्याच्या रूपातही तुम्हाला पाहिलेला आठवत असेल. असाच काहीसा किल्ला बाहुबली द कनक्लुजनच्या क्लायमेक्स सीन्समध्येही दिसलाय. त्यामुळे पद्मावतीच्या ट्रेलरच्या पहिल्या सीनपासूनच या दोन्स सिनेमाच्या ट्रेलरशी त्याची तुलना व्हायला सुरुवात होते.

दुसरी तुलना होतेय ती स्पेशल इफेक्टचा वापर करून दाखवलेल्या भव्यतेबाबत, तर अशी भव्यता बाहुबलीच्या दोन्ही भागांमध्ये माहिश्मती साम्राज्य दाखवण्यासाठी वापरली होती. तशीच पद्मावतीत चित्तुरचं साम्राज्य दाखवण्यासाठी वापरण्यात आलीत.त्यामुळे डोळ्यांना हवी तेवढी भव्यता दाखवणं अगदी सहज शक्य झालंय.

त्यानंतर काहीशी अशीच तुलना होते ती अल्लाउद्दीन खिलजीच्या शामियान्याचा सीन पाहिल्यावर.असाच डेरा बाजीराव मस्तानीतही बाजीरावाचा शामियाना म्हणून दिसला होता. याच शामियान्यात बाजीराव मस्तानीची पहिली भेट झाल्याचं तुम्हाला आठवत असेल. फरक पडलाय तो फक्त पांढऱ्याच्या ऐवजी काळ्या पडद्यांचा आणि पक्षांच्या पिंजऱ्यांचा.

पद्मावतीचा ट्रेलर पाहिल्यावर बाजीराव मस्तानीमधलेच काही सेट्स जसेच्या तसे भन्साळींनी या सिनेमातही वापरले की काय अशीही शंका येते.आता हेच बघा या सीनमध्ये राणी पद्मावती राजा रावल रतन सिंगच्या पगडीला टाके घालताना दिसतीये.त्यांच्या मागे दिसणारं हे कुंड तुम्हाला बाजीराव मस्तानीमध्ये मस्तानीच्या महालात पाहिल्याचं आठवत असेल. खरं तर पाणी, कारंजी आणि त्यात फुललेली कमळं ही बाहुबली सिनेमातही अनेक ठिकाणी होती. त्यामुळे त्यात नाविन्य असं काहीही उरलेलं नाही.

आता सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची तुलना होतीये ती या तिन्ही सिनेमांच्या ट्रेलरमधल्या अॅक्शन सीक्वेन्सेसची, तर पद्मावती आणि बाजीराव मस्तानी यांच्यातल्या अॅक्शन सीन्समध्येही साम्य आहे.मोठ्या प्रमाणावर घोडदौड करत येणारं सैन्य.हे काय आपण पद्मावतीत पहिल्यांदा पाहत नाही आहोत.ते आपण बाहुबलीच्या क्लायमेक्स सीनमध्येच पाहिलं होतं.त्यानंतर दुसऱ्या भागातही पाहिलं.मग बाजीराव मस्तानीतही पाहिलं आणि आता पद्मावतीत पाहतोय.याशिवाय फाईट सीन्सही पाहिले तर रणवीर सिंगला पाहून नकळत पहिल्या बाहुबलीतल्या कालकेयाची आठवण आल्याशिवाय राहत नाही...संजय लीला भन्साळींनी मात्र बाहुबलीपेक्षा पद्मावतीतले अॅक्शन सिक्वेन्स जबरदस्त असतील असा दावा केलाय.त्यात कितपत तथ्य असेल ते हा सिनेमा रिलीज झाल्यावरच कळेल.

तुर्तास कितीही तुलना केली तरीही कमीच पडावी एवढं साम्य या तीन सिनेमांच्या ट्रेलरमध्ये दिसतंय. प्रेक्षकांच्या चाणाक्ष नजरेतून ते सुटलं नसल्याने सोशल मीडियावर याची चर्चाही सुरू झालीय. मात्र ही चर्चा प्रत्येक सिनेमाबाबत होते. त्यामुळे या सगळ्या चर्चांना पूर्णविराम देत पद्मावती कथेच्या दृष्टीने या सिनेमांपेक्षा वेगळा ठरेल आणि बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरेल एवढीच आशा सध्या आपण बाळगू शकतो.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 11, 2017 04:33 PM IST

ताज्या बातम्या