News18 Lokmat

पद्मावत सिनेमाला आता गोवा आणि हिमाचल प्रदेशमध्येही बंदी घालण्याची शक्यता

राजस्थान सरकारपाठोपाठ आता गोवा आणि हिमाचल प्रदेशमध्येही हा सिनेमा रिलीज करू नये अशी मागणी करण्यात आली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Jan 11, 2018 10:25 AM IST

पद्मावत सिनेमाला आता गोवा आणि हिमाचल प्रदेशमध्येही बंदी घालण्याची शक्यता

11 जानेवारी : 'पद्मावती' या सिनेमाचं नाव बदलून 'पद्मावत' असं केलं. त्यानंतर त्यात अनेक बदल केल्यानंतरही सिनेमाच्या रिलीजचा मार्ग मोकळा होईल असं वाटत नाही आहे. सेन्सॉर बोर्डाने एखाद्या सिनेमाला हिरवा कंदिल दाखवला की त्याच्यापुढे कुणाचं काहीही चालत नाही असं म्हणणं आता या सिनेमाच्या निमित्ताने इतिहासजमा झालं आहे. राजस्थान सरकारपाठोपाठ आता गोवा आणि हिमाचल प्रदेशमध्येही हा सिनेमा रिलीज करू नये अशी मागणी करण्यात आली आहे.

आधी करणी सेनेच्या दबावापुढे झुकून राजस्थान सरकारनं हा सिनेमा रिलीज न करण्याचा निर्णय घेतला. यामागे जनभावना दुखावणार असतील तर सिनेमा रिलीज करायची गरज नसल्याचं स्पष्टीकरणही देण्यात आलं. राजस्थान पाठोपाठ आता गोव्यासारख्या शांत राज्यातूनही पद्मावत हा सिनेमा रिलीज केला जाऊ नये अशी मागणी पुढे आलीय. गोवा पोलिसांनी तसा अहवालच गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना दिलाय. सध्या गोव्यात पर्यटनाचा हंगाम चालू आहे. अशात पोलिसांची मोठी कुमक ही पर्यटन स्थळांवरील बंदोबस्तासाठी तैनात आहे. अशात या सिनेमाविरोधात निदर्शनं झाल्यास किंवा थिएटरमध्ये तोडफोडीच्या घटना घडल्यास त्याला संरक्षण देणं अशक्य असल्याची भूमिका पोलिसांनी घेतलीय. त्यामुळे पर्रिकर सरकारही काहीसं बॅकफूटवर गेलं असून पद्मावतच्या रिलीजला परवानगी द्यायची की नाही याबाबत संभ्रमावस्था कायम आहे.

दुसरीकडे हिमाचल प्रदेश सरकारनेही या सिनेमाच्या रिलीजबाबत सावध पवित्रा घेतलाय. हिमाचलचे मुख्यमंत्री जर राम ठाकूर यांनी हा सिनेमा आक्षेपार्ह आहे. आणि तो रिलीज झाल्यास समाजात वेगळा संदेश जाईल अशी भूमिका घेतलीय. राजपूत आणि अन्य संघटनांनी या सिनेमाला केलेला विरोध लक्षात घेता तुर्तास हा सिनेमा रिलीज करण्याबाबत पुनर्विचार करू असं त्यांनी म्हंटलं आहे.

एकिकडे सेन्सॉरने युए सर्टिफिकेट दिल्यानंतर पद्मावत हा सिनेमा रिलीज करण्यासाठी 25 जानेवारीची तारिख जाहीर करण्यात आली. मात्र दुसरीकडे हा सिनेमा रिलीज करण्यातले अडथळे कमी होण्याऐवजी वाढतच चाललेत. अशात हा सिनेमा आता नक्की किती राज्यांमध्ये सुरळीतपणे रिलीज होतो याकडे निर्मात्यांचं लक्ष लागलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jan 11, 2018 10:25 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...