मुंबई, 11 नोव्हेंबर : 'माझ्या नवऱ्याची बायको'मध्ये नवी शनाया आली आणि तिनं जुन्या शनायाची नुसती जागा घेतली नाही, तर आपलं वेगळं स्थानही निर्माण केलं. या नव्या शनायाचा म्हणजे ईशा केसकरचा आज ( 11 नोव्हेंबर ) वाढदिवस. तिच्या फॅन्सना आज तिला सोशल मीडियावर किंवा फोनवर शुभेच्छा द्यायच्या असतील तर पेशन्स वाढवावे लागतील. तुमच्या शुभेच्छांना जरा उशिराच प्रतिसाद मिळेल.
शनायाचं बर्थडे सेलिब्रेशन तसं काल रात्रीपासून सुरू झालंय. काल रात्री अचानक तिच्या जपानी क्लासमधल्या मित्रमैत्रिणींनी तिला सरप्राईझ दिलंय. केक घेऊन सगळे रात्रीच तिच्या घरी धडकले. मग काय जंगी सेलिब्रेशन.
सेटवरून गुरू, राधिका सगळेच तिला व्हाॅट्सअॅप ग्रुपवर मेसेज करतायत. सगळे तिला सेटवर बोलावतायत केक कापायला. पण ईशानं आज शूटिंगपासून सुट्टी घेतलीय. कारण आज तिला पूर्ण आराम करायचाय.
News18लोकमतशी बोलताना ईशा म्हणाली, ' मी आज दिवसभर मस्त झोप काढणार आहे. आज सकाळी मी 10.30ला उठले. झोप ही माझ्यासाठी मोठी लक्झरी आहे.'
ईशाला दिवाळीची सुट्टी असली तरीही घरात गडबड होतीच. ती म्हणाली, 'सणावारी आपण एंजाॅय करतो. पण तसा आराम होत नाही. उलट धावपळही होते. म्हणून आजचा दिवस मी पूर्णपणे आराम करायचं ठरवलंय. दुपारी जेवल्यावर वामकुक्षीही घेणार आहे.'
त्यामुळे तिच्या फॅन्सना सोशल मीडियावर तिचा रिप्लाय लगेच मिळणं कठीण आहे. कारण ती फोनच बाजूला ठेवणार आहे.
ईशाला देखील शनायासारखीच शॉपिंगची खूप आवड आहे. नुकतंच तिने रसिकाची जागा घेतली असल्यामुळे मालिकेच्या कपडेपटातले रसिकाचे कपडे ईशाला होत नाहीत. त्यामुळे काही दिवस आधीचे कपडे वापरून तिनं वेळ निभावून नेली. पण ईशासाठी नवे कपडे आणावे लागले. त्यामुळे शूटिंगमधून वेळ काढून तिच्यासाठी कपड्यांची खरेदी जोरात सुरू आहे म्हणे. प्रेक्षकांना नव्या शनायाचा लुकही आवडतोय अशी चर्चा आहे.
याबद्दल बोलताना ईशा म्हणाली, 'मला स्वतःला शॉपिंग खूप आवडतं. पण शनायाची व्यक्तिरेखा शॉपिंगसाठी वेडी आहे. तिला सर्व गोष्टी मॅचिंग लागतात. ती कपडे रिपीट नाही करत किंवा ती स्वस्त कपडे वापरत नाही, त्यामुळे माझी जेव्हा शनायाच्या व्यक्तिरेखेसाठी निवड झाली तेव्हा माझ्यासाठी वेगळं शॉपिंग करण्यात आलं. जवळजवळ महिन्याभरातच माझ्याकडे शनायासाठी ५० कपड्यांचे जोड आहेत.'
Birthday Special : 'असं' करणार शनाया वाढदिवसाचं सेलिब्रेशन!
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.