नवाझुद्दीनच्या पुस्तकामुळे निहारिकासोबतचं त्याचं अफेअर चर्चेत

नवाझुद्दीनच्या पुस्तकामुळे निहारिकासोबतचं त्याचं अफेअर चर्चेत

हे पुस्तक सध्या एका वेगळ्याच कारणाने गाजतंय.कारण नवाझने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खळबळजनक गोष्टी या पुस्तकातून शेअर केल्यात.

  • Share this:

विराज मुळे, 26 आॅक्टोबर:  नवाझुद्दीन सिद्दीकी ह्या अभिनेत्याने गेल्या काही वर्षात अथक मेहनतीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलंय. मात्र नवाझचा हाच स्ट्रगल एका पुस्तकातून आपल्या भेटीला येणारे. मात्र हे पुस्तक सध्या एका वेगळ्याच कारणाने गाजतंय.कारण नवाझने त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खळबळजनक गोष्टी या पुस्तकातून शेअर केल्यात.

तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने सगळं जिंकलं. नवाझुद्दीन सिद्दीकीचं आजचं स्थान पाहिलं तर आपल्याला अगदी असंच वाटतं.मात्र त्याच्यासाठी हा प्रवास एवढा सोपा होता का..? तर निश्चितच नाही...इथवर पोहोचण्यासाठी त्याने घेतलेली मेहनत, घेतलेले कष्ट, पाहिलेली वाट हे सारे अनुभव नवाझने आता शब्दबद्ध केलेत. 'अॅन ऑर्डिनरी लाईफ - अ मेमॉयर' असं या पुस्तकाचं नाव आहे. मात्र हे पुस्तक सध्या एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आहे. आणि ते म्हणजे नवाझने त्याच्या आयुष्यातील एका अर्धवट राहिलेल्या प्रेमप्रकरणाबद्दल केलेल्या खुलाशामुळे.

नवाझच्या आयुष्यात काही मुली आल्या मात्र त्यातल्या एका खास प्रकरणावर नवाझने या पुस्तकातून खुलासा केलाय.ते होतं मिस लवली फेम अभिनेत्री निहारिका सिंगसोबतचं त्याचं अफेअर. निहारिकाच्या आधी सुझॅन या न्यूयॉर्कमधील एका ज्युईश मुलीसोबत नवाझचं अफेअर सुरू होतं. सुझॅन ही भारतात येऊन नवाझसोबत रहायला लागली.त्यानंतर विझा संपल्याच्या निमित्ताने ती न्यूयॉर्कला परतली मात्र बरेच दिवस भारतात आली नाही. त्याच दरम्यान मिस लवली या सिनेमाचं शूटिंग सुरू झालं आणि नवाझच्या आयुष्यात निहारिकाचं आगमन झालं.तिच्याबदद्ल लिहिताना नवाझनं लिहिलंय.

'मिस लवली'चं शूटिंग सुरू असतानाच एके दिवशी गाण्याचं शूटिंग सुरू होतं. माझी सहकलाकार निहारिका सिंगला काहीतरी झालं. ती अचानक थंड पडली आणि माझ्यापासून काहीसं अंतर ठेवून वागायला लागली.मला कळेच ना तिला काय झालंय. एरवी तर ती फारच सोशल मैत्रीपूर्ण आणि व्यवस्थित बोलणारी होती. त्यानंतर मला वाटलं मीच तिला याबाबत विचारावं म्हणून मी तिला विचारलं. एकदा दोनदा तीनदा विचारलं पण तरीही ती काहीच बोलायला तयार नव्हती. अखेर मी तिला माझ्या घरी जेवायला बोलावण्याचा निर्णय घेतला. मटन डिश बनवणं ही माझी स्पेशालिटी होती. तिनं नम्रपणे हे आमंत्रण स्वीकारलं. ती घरी आली. व्यवस्थित जेवली आणि माझी स्तुतीही केली.

त्यानंतर तिने मला तिच्या घरी येऊन मटन बनवण्याचं निमंत्रण दिलं. मी त्यानुसार तिच्या घरी गेलो आणि तिने ज्यापद्धतीने तिचं घर सजवलं होतं ते पाहून थक्क झालो.तिने तिचं घर जवळपास 100 हून अधिक मेणबत्त्यांनी सजवलं होतं. तिने अतिशय सुंदर ड्रेस परिधान केला होता. त्या प्रकाशात तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसत होतं. त्या क्षणी पुढचा मागचा विचार न करता मी तिला माझ्या मिठीत घेतलं आणि थेट बेडरूममध्ये घेऊन गेलो आणि तिथूनच माझं आणि निहारिकाचं प्रेम सुरू झालं.

नवाझने या प्रेम प्रकरणाबद्दल लिहितानाच हे प्रकरण नक्की कसं संपलं त्याचाही खुलासा केलाय.

सुझॅन माझ्या आयुष्यातून गेली असली तरीही तिचे ई-मेल्स मला येतच होते. एके दिवशी निहारिकाने हे ई-मेल्स पाहिले आणि याबाबत प्रश्न विचारला. त्यावर मी तिला खरं काय ते सांगून टाकलं.मात्र तिने मला हे चुकीचं असल्याचं सांगितलं आणि परस्पर सुझॅनला उत्तरं पाठवायला सुरूवात केली. ती उत्तरं वाचून सुझॅनला खूप वाईट वाटत होतं. ती मला तसे रिप्लाय ही पाठवत होती.

हे तू लिहीत नाहीयेस असंही मला लिहिलं मात्र मी या मेल्सकडे दुर्लक्ष केलं. निहारिका ही खरं तर हुशार मुलगी होती. माझा संघर्ष तिला समजायचा. मात्र नंतर ती वारंवार मला फोन करून मी कुठे आहे काय करतोय यावर लक्ष ठेवायला लागली. तिला माझ्याकडून प्रियकर प्रेयसीमधल्या संवादाप्रमाणे प्रेमळ संवाद अपेक्षित होता. मात्र मी त्यात कमी पडत होतो. मी फक्त तिच्या घरी जायचो माझा स्वार्थ साधायचो आणि निघून जायचो. असाच एके दिवशी मी तिच्या घरी गेलेलो असताना लाल कपड्यांमध्ये ती अतिशय सुंदर दिसत होती. मी तिच्या जवळ गेलो पण तिने मला दूर लोटलं आणि आपण इथंच थांबुयात असं सांगितलं. मी तिला विनवण्या केल्या, समजूत काढण्याचा प्रयत्न केला.रडलोही. पण ती तिच्या निर्णयावर ठाम होती.अखेर तिने माझ्याशी संपर्क तोडून टाकला.

नवाझच्या निहारिकासोबत झालेल्या प्रेमभंगानंतर दोन महिन्यांनी त्याच्या आयुष्यात अंजली आली. जिच्याशी वर्षभरात त्याने लग्न केलं.नवाझने त्याच्या पुस्तकात केलेल्या या खुलाशांमुळे हे पुस्तक प्रकाशित होण्यापूर्वीच चर्चेत आलंय. आपल्या आयुष्यात जे घडलं ते त्या त्या व्यक्तींच्या नावासह तपशिलवार लिहिलं असल्याचं त्याने म्हटलंय. हे पुस्तक आल्यावर अनेकजण माझ्याशी संबंध तोडून टाकतील असंही त्याने स्पष्ट केलंय. मात्र त्यामुळेच नवाझच्या चाहत्यांमध्ये या पुस्तकाबाबतची उत्सुकता वाढलीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 03:50 PM IST

ताज्या बातम्या