मुंबई 28 फेब्रुवारी : प्रियांका चोप्रा ही एक अष्टपैलू अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिनं आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर बॉलिवूड आणि हॉलिवूड या दोन्ही सिनेसृष्टीत आपलं एक वेगळ स्थान प्रस्थापित केलं आहे. त्यामुळे अनेकदा पाश्चात्य चाहते देखील तिच्या पोस्टवर कॉमेंट करताना दिसतात. दरम्यान अशाच एका ट्विटमुळं प्रियांकाच्या चाहत्यांमध्ये एकच गोंधळ माजला होता. प्रियांकानं निकसोबत घटस्फोट घेतला की काय? अशी चर्चा या ट्विटमुळं सर्वत्र होऊ लागली.
एका युझरनं प्रियांका ऐवजी अभिनेत्री जमीला जमील हिला निकची पत्नी समजून दोघांचा घटस्फोट झाला की काय? असं ट्विट केलं होतं. खरं तर जमीला आणि प्रियांका एकसारखे दिसत नाहीत. परंतु त्या युझरनं नावात गोंधळ घातला की काय? अशी शंका प्रियांकाच्या चाहत्यांना येऊ लागली. त्यानंतर त्यांनी थेट प्रियांकालाच दोघांच्या घटस्फोटाचं कारण विचारलं. असाच काहीसा प्रकार जमीलाच्या चाहत्यांमध्येही घडला. त्यांनी देखील या ट्विटचा हवाला देत तू निकसोबत लग्न कधी केलं होतं? असा सवाल करण्यास सुरुवात केली. अखेर वाढता गोंधळ थांबवण्यासाठी दोन्ही अभिनेत्रींनी यावर स्पष्टीकरण दिलं.
“प्रियांका चोप्रा ही भारतीय महिला माझ्यासारखी दिसत नाही. आम्ही एकमेकांपेक्षा फारच वेगळे दिसतो. मला वाटतं निक आणि प्रियांका एकमेकांसोबत खूप आनंदी आहेत.” अशा आशयाचं ट्विट करुन जमीलानं हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न केला. या ट्विटला प्रियांकानं देखील रिट्विट करत तिच्या वक्तव्याला आपली सहमती दर्शवली. अभिनेत्रींचे हे ट्विट्स सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.