News18 Lokmat

सेक्स आणि क्राईमच्या पलिकडे वेब सीरिजनी जायला हवं, म्हणतायत सिने अभ्यासक

नेटफ्लिक्सवर तर खास वेब सीरिज बनवल्या जातायत. लस्ट स्टोरी , सीक्रेड गेम्स यांसारख्या वेब सीरिज सध्या चांगल्याच गाजतायत.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Sep 24, 2018 05:56 PM IST

सेक्स आणि क्राईमच्या पलिकडे वेब सीरिजनी जायला हवं, म्हणतायत सिने अभ्यासक

मुंबई, 24 सप्टेंबर : मग काय घेतलंस तू? नेटफ्लिक्स की अॅमेझाॅन? तरुण वर्गात असा संवाद सर्रास ऐकायला मिळत असतो. सध्या जमाना आहे वेब सीरिजचा. नेटफ्लिक्सवर तर खास वेब सीरिज बनवल्या जातायत. लस्ट स्टोरी , सीक्रेड गेम्स यांसारख्या वेब सीरिज सध्या चांगल्याच गाजतायत.

'सीक्रेड गेम्स 2'चा प्रोमोही आलाय. याशिवाय एकता कपूरही 'xxx' नावाची वेबसीरिज घेऊन येतेय. त्याचाही बोल्ड प्रोमो बाहेर आलाय.ट्रिपस एक्स. यात सेक्स, महिला आणि काँट्रोव्हर्सी हे विषय हाताळलेत. या सीरिजमध्ये  शांतनु महेश्वरी, अंकित गेरा, रित्विक धंजानी यांची मुख्य भूमिका आहे. बोल्डनेसची सगळी जबाबदारी पेललीय  कायरा दत्त आणि मेहरीन माजदा यांनी.या ट्रिपल एक्समध्ये एकूण 5 कथा आहेत.

याशिवाय निपुण धर्माधिकारीनं लिहिलेली 'साईड हिरो' ही वेब सीरिजही येणार आहे. यात सिनेजगतावर विडंबन केलंय. एकूणच वेब सीरिजची संख्या वाढलीय. मोबाईलवर तुम्ही कुठेही ही सीरिज पाहू शकता. मग अशा वेळी सिनेमांवर याचा परिणाम होऊ शकतो का? कारण आजच्या बिझी जगात थिएटरला जायला जास्त वेळ देण्यापेक्षा घरबसल्या किंवा ट्रॅफिकमधल्या प्रवासात सीरिज बघणं सोपं नाही का?

चित्रपट समीक्षक दिलीप ठाकूर यांना वाटतं, ही नक्कीच सिनेमाला स्पर्धा आहे. हा नवा ट्रेंड येतोय. सध्या वेब सीरिज सेक्स आणि क्राईम  यावरच असतात. त्यावर ठाकूर सांगतात, ' वेब सीरिजना आपला दर्जा टिकवावा लागेल. तेच तेच विषय ठेवून चालणार नाही. त्यात बदल करावे लागतील.'

त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, हल्ली सिनेसृष्टीतले कलाकार वेब सीरिज करतात. माध्यमं महत्त्वाची. मग ती कुठली का असेनात. बदल आणि आव्हानं वाढलीयत, असंही ते म्हणाले. म्हणूनच नवाजुद्दीन, सैफ अली, कोंकणा सेनसारखे कलाकार वेब सीरिजकडे आनंदानं वळतायत.

Loading...

सिने अभ्यासक संतोष पाठारे म्हणतात, ' वेब सीरिजमुळे सिनेमांवर परिणाम होईल असं अजून तरी वाटत नाही. आता येणाऱ्या बऱ्याच वेब सीरिज या सेक्स आणि गुन्हा यावर असतात. दुसरा कुठला कंटेन्ट फारसा आढळत नाही. त्यामुळे सिनेमांचा प्रेक्षक त्याच्या आवडते इतर विषय पाहायला सिनेमालाच जाईल.

ते पुढे म्हणाले, 'आजही गावातले लोक फारसे इकडे वळत नाहीत. शहरातला स्त्रीवर्गही वेब सीरिज कमी प्रमाणात बघतो. वेब सीरिज तरुणांना समोर ठेवून बनवल्या जातायत. पण आजही सिनेमे 100 कोटींच्या घरात जातायत. दोन्ही माध्यमं वेगवेगळी आहेत.'

दिलीप ठाकूर यांचं मत वेगळं आहे, ' ठग्ज आॅफ हिंदोस्तानसारखा मोठा सिनेमा येईल, तो पाहायला प्रेक्षक थिएटरमध्ये जाईल. पण वेब सीरिजनी दर्जा सुधारायला हवा. सेक्स आणि क्राईमच्या पलिकडे जायला हवं.'

वेब सीरिजचं माध्यम नवं आहे. सिनेमांवर त्याचा अजून तरी परिणाम जाणवत नाही. पूर्वी नव्यानं टीव्ही आला, तेव्हाही सिनेमावर परिणाम होईल अशा चर्चा सुरू होत्या. पण टीव्हीचाही टीआरपी वाढतो आणि सिनेमेही हाऊसफुल जातात. ज्यांना ज्यांना ज्या माध्यमाचा आनंद घ्यायचाय त्यांनी तो घ्यावा. शेवटी स्पर्धा दर्जा वाढवायला मदत करते. सिनेमा-वेब सीरिजच्या स्पर्धेत प्रेक्षकांना दर्जेदार कलाकृती मिळत असेल, तर ते नक्कीच स्वागतार्ह आहे.

PHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Sep 24, 2018 05:48 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...