मुंबई, 23 आॅगस्ट : छोट्या पडद्यावर ती अवतरली, घराघरात पोचली. आणि मग रसिक प्रेक्षकांच्या मनामनात पोचली. आताही तिच्या ओघवत्या वाणीनं प्रेक्षकांना नवे सूर अनुभवता येतायत. बरोबर, आम्ही स्पृहा जोशीबद्दल बोलतोय. सध्या स्पृहा कलर्स मराठीवरच्या सूर नवा,ध्यास नवा या रिअॅलिटी शोचं अँकरिंग करतेय. स्पृहा या शोबद्दल कमालीची उत्साही वाटली. ' मी छोट्या पडद्यावर काम केलं असलं तरीही रिअॅलिटी शोचं अँकरिंग पहिल्यांदाच करतेय.' न्यूज18लोकमतशी बोलताना स्पृहा म्हणाली. ' मी अनेक स्टेज शोजची अँकरिंग्ज केलीयत. पण छोट्यांच्या शोसाठी करणं हे वेगळं आव्हान असतं. ' स्पृहा सांगते.
सिटी आॅडिशन्सपासून मेगा आॅडिशन्सपर्यंत स्पृहा या बच्चेकंपनीसोबत होती. स्पृहा म्हणाली, ' आता सगळ्यांशी चांगली मैत्री झालीय. मुलांना हँडल करणं एक आव्हानच आहे. कारण त्यांच्या प्रतिक्रिया पूर्ण अनपेक्षित असतात. मजेशीर असतात. आपल्याला पूर्ण तयारी करून जावं लागतं.' या स्पर्धकांची निरागसता स्पृहा वेळोवेळी अनुभवत असते. तिनं एक किस्सा सांगितला. ती म्हणाली, नेहा म्हणून एक छोटी आहे. तिनं मला विचारलं तुला काय आवडतं? मी तिला भेंडीची भाजी सांगितलं. तशी ती दुसऱ्या दिवशी माझ्यासाठी भेंडीची भाजी आणि भाकरी घेऊन आली.'
स्पृहाचे हे छोटे मित्रमैत्रिणी तिच्या जवळ बऱ्याच गोष्टी शेअर करतात. अगदी अवधूतदादाला मस्का कसा लावायचा इथपासून ते सेटवरचं बर्थडे सेलिब्रेशन... सगळी धमाल स्पृहाताईबरोबर. स्पृहा सांगते, ही स्पर्धा गंभीर आहे. पण मुलांवर कसलाच तणाव आणायचा नाही, याची काळजी आम्ही घेतो.
रंगभूमीवर स्पृहाचं डोण्ट वरी बी हॅपी हे नाटक चांगलं चाललं होतं. अचानक स्पृहानं त्यातून एक्झिट घेतली. त्याबद्दल तिला विचारलं असता ती म्हणाली, 'हा निर्णय विचारपूर्वक घेतला गेला होता. नांदी, समुद्र आणि डोण्ट वरी... सगळीच नाटकं लागोपाठ झाली. डोण्ट वरीचे 275 प्रयोग झाले. पण मला ते थोडं दमवणारं होत होतं. एनर्जी शाबूत ठेवायची होती. म्हणून सामुदायिकपणे हा निर्णय घेतला. चांगलं चाललेलं नाटक थांबायला नको, म्हणून रिप्लेसमेंट केली. '
स्पृहाचे सिनेमेही सुरू आहेत. आता हृषिकेश जोशीबरोबरचा होम स्वीट होम पुढच्या महिन्यात रिलीज होईल. सुनील सुखटनकर-सुमित्रा भावेंचा वेलकम होम सिनेमात ती आहे. बाईचं घर नेमकं कोणतं? नवऱ्याचं की तिचं स्वत:चं हा प्रश्न हा सिनेमा विचारतो. अनेक पिढ्यांचा संघर्ष या सिनेमात दाखवलाय. मृणाल कुलकर्णी, सुबोध भावे असे अनेक दिग्गज कलाकार या सिनेमात आहेत. त्याबरोबर सिद्धार्थ चांदेकर, कश्यप परुळेकरसोबत ती सिनेमा करतेय. वैभव तत्त्ववादीबरोबरही आणखी एक सिनेमा येतोय.
स्पृहा एकदम बिझी आहे. त्यात तिच्या कविताही सुरू आहेत. एका कार्यक्रमात तेजस्विनी पंडित म्हणाली होती, स्पृहाच्या कवितेतला नकारात्मकता सोडली तर बाकी मला आवडतं. याबद्दल स्पृहाला विचारलं असता ती म्हणते, ' तेजूनं माझी एखादी निगेटिव्ह कविता वाचली असेल. पण कवितेत मी वेगवेगळे विषय हाताळते. ते त्या त्या वेळचं एक्सप्रेशन असतं.'
स्पृहाला स्वत:मधला कोणता गुण आवडतो? यावर ती म्हणते, ' मी अॅडजस्ट करणारी आहे. इतरांच्या कलानं घेते. माझं सहसा कुणाबरोबर भांडण होत नाही. आणि हे संस्कार मला माझ्या आईकडून आलेत. अगदी कडक संस्कार.'
सिनेमा, नाटक, टीव्ही काहीही असो, स्पृहाचा चेहरा प्रत्येकाला जवळचा वाटतो. म्हणून तिचे फॅन्सही खूप आहेत. स्पृहाच्या यशाचा हा झोका आणखी उंच उंच जाऊ दे.
VIDEO : देवदुतासारखे धावून आले पोलीस, आगीच्या वणव्यातून वर ओढून काढलं महिलेला
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Reality show