मुंबई, 09 जानेवारी : बॉलिवूडची लोकप्रिय गायिका नेहा कक्कर मागच्या काही दिवसांपासून सिंगिंग रिअलिटी शो इंडियन आयडॉलमुळे चर्चेत आहे. शोच्या प्रत्येक एपिसोडमध्ये नेहाची चर्चा होतेच. कधी स्पर्धकांची स्ट्रगल स्टोरी ऐकून तिला रडू येत तर कधी एखाद्याच्या टॅलेंटची दाद देत ती त्या स्पर्धकाला बक्षीस देते. पण आता नेहाच्या चाहत्यांसाठी काहीशी धक्कादायक बातमी आहे. इंडियन आयडॉलच्या मंचावरच नेहाच्या लग्नाची तयारी झाल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर ज्या मुलाशी ती लग्न करणार आहे त्याच्या संपूर्ण फॅमिलीलाही नेहा भेटली. त्यांच्या भेटीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
इंडियन आयडॉलचा होस्ट आदित्य नारायणचे वडील उदित नारायण यांनी नुकतीच त्याच्या पत्नीसोबत या शोमध्ये हजेरी लावली होती. टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार आगामी एपिसोडमध्ये इंडियन आयडॉलच्या मंचावर उदित नारायण आणि अलका यागनिक दिसणार आहेत. यावेळी उदित नारायण त्यांचा मुलगा आणि नेहा कक्कर यांची मस्करी करताना दिसणार आहे. ते हेही सांगताना दिसणार आहेत की, ते हा शो पहिल्या दिवसापासून फॉलो करत आहेत याची दोन कारणं आहेत. एक तर या शोमध्ये सर्वच स्पर्धक खूप टॅलेंटेड आहेत आणि दुसरं म्हणजे ते नेहा कक्करला सून म्हणून घरी आणण्याचा विचार करत आहेत.

आदित्यचे वडील उदीत नारायण यांनीच नाही तर त्याची आई दीपा नारायण यांनी सुद्धा नेहाला सून म्हणून घरी आणण्याचा विचार केला आहे. एवढंच नाही तर यावेळी नेहाच्या आई-बाबांनीही या शोमध्ये हजेरी लावली होती आणि त्यांनीही या दोघांच्या लग्नाला मान्यता दिली आहे. दरम्यान दोन्ही फॅमिलींच्या भेटीनंतर आदित्य खूप खूश दिसला मात्र नेहानं सांगितलं की जर मी एवढ्या लवकर लग्नाला तयार झाले तर मग काही मजा राहणार नाही. हा एपिसोड शूट झाला असून लवकर त्याचं प्रसारण केलं जाणार आहे.
तसं पाहायला गेलं तर हा शोचा एक भाग असू शकतो. कारण होस्टिंग दरम्यान आदित्य नेहमीच नेहाशी फ्लर्ट करताना दिसतो. त्यामुळे हे वृत्त कितपत खरं आहे याची कोणतीही पुष्टी झालेली नाही. त्यामुळे नेहा कक्कर तिच्या लग्नाच्या वृत्तावर काय प्रतिक्रिया देते याची सर्वांना उत्सुकता आहे. कारण वर्षभरापूर्वी नेहाचा ब्रेकअप झाला असून त्यावेळी ती डिप्रेशनची शिकार झाली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.