मुंबई,04 फेब्रुवारी- बॉलिवूडमधील हरहुन्नरी अभिनेता अशी नवाजुद्दीन सिद्दीकीची ओळख आहे. अभिनेत्याने विविध धाटणीच्या भूमिका साकारत बॉलिवूडमध्ये आपलं स्थान निर्माण केलं आहे. व्यावसायिक आयुष्यात यशस्वी असणारा अभिनेता खाजगी आयुष्यात मात्र संकटात सापडला आहे. नवाजुद्दीनच्या पत्नीने अभिनेत्यावर आणि त्याच्या कुटुंबियांवर गंभीर आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यांनतर आता न्यायालयाने अभिनेत्याला नोटीस बजावली आहे. पाहूया काय आहे नेमकं प्रकरण.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलियाने नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबावर गंभीर आरोप लावले आहेत. यापूर्वी आलियाने केवळ नवाजच्या आईवर आरोप केले होते. दरम्यान आता आलियाने नवाजुद्दीनवरसुद्धा आपल्याला त्रास दिल्याचे आणि वाईट वागणूक दिल्याचे आरोप केले आहेत. आपल्याला घरातून काढण्याचा पुरेपूर प्रयत्न झाल्याचं आलियाने म्हटलं आहे. इतकंच नव्हे तर आपल्याला बाथरुम, किचन वापरण्यास मनाई केल्याचं आणि आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च न उचलल्याचा आरोपही नवाजुद्दीनच्या पत्नीने केला आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या काही दिवसांपासून नवाजुद्दीन सिद्दीकीची आई आणि त्याची पत्नी यांच्यामध्ये वाद सुरु आहे. याच कारणामुळे अभिनेत्याच्या आईनेही त्याची पत्नी म्हणजेच आपल्या सुनेविरुद्ध एफआयआर दाखल केला होता. परंतु आता अभिनेत्याची पत्नी आलियानेही अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. आलियाने सांगितलं की, तिला घरात खूप समस्या येत आहेत. तिच्या म्हणण्यानुसार, तिच्याच घरात तिचं अन्नपाणी बंद करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर तिला स्वयंपाकघरात जाण्याची परवानगी नाही. आपल्याला सोफ्यावर झोपावं लागत असल्याचंही आलियाने म्हटलं आहे.
अभिनेत्याला कोर्टाने बजावली नोटीस-
आलियाने आता अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या आईविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. त्यानंतर आता कोर्टाने अभिनेत्याला नोटीस बजावली आहे. आलियाच्या वकिलाने म्हटलं आहे, नवाजुद्दीनच्या आईने आलियाला त्याची पत्नी मानण्यापासून नकार दिला आहे. त्यांच्या मते,आलिया आणि नवाजुद्दीनचा दोन वर्षांपूर्वी घटस्फोट झाला आहे. यावर आलियाच्या वकिलांचं म्हणणं आहे, जर या दोघांचा घटस्फोट झाला आहे तर त्यांच्या सर्व कागद्पत्रांवर अजूनही पत्नीच्या ठिकाणी आलियाचं नाव का लावण्यात आलं आहे?
नवाजुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया यापूर्वी दुबईत राहात होती. मात्र आता ती भारतात परत येऊन नवाजुद्दीनच्या राहात आहे. 2020 मध्ये दोघांमध्ये झालेल्या वादात आलियाने नवाजुद्दीनसोबत घटस्फोट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिने अभिनेत्याला कायदेशीर नोटीसदेखील बजावली होती. परंतु नंतर सामंजस्याने त्यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय बदलला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood, Entertainment