तनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा

तनुश्रीच्या आरोपाला नवे वळण, नानांनी केला नवा खुलासा

तनुश्रीने लावलेले सर्व आरोप साफ खोटे असल्याचं आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

  • Share this:

मुंबई, 16 नोव्हेंबर : अभिनेत्री तनुश्री दत्ताने केलेल्या आरोपांना नाना पाटेकर यांनी आज लेखी उत्तर दिले. महिला आयोगाने दिलेल्या नोटीसीला नानांनी ३ पानी पत्रात आपली भूमिका मांडली आहे.

नाना पाटेकर यांनी तनुश्री दत्ताचे सर्व आरोप फेटाळून लावले. तनुश्रीने लावलेले सर्व आरोप साफ खोटे असल्याचं आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

तसंच २००८ साली हाॅर्न ओके सिनेमात वाद झाल्यानंतर गोरेगाव पोलीस स्टेशनमध्ये तनुश्रीने केलेल्या तक्रारीमध्ये केवळ तोडफोडीची उल्लेख करण्यात आला होता पण यात कुठेही विनयभंगाचा उल्लेख करण्यात आलेला नव्हता हा मुद्दा नाना पाटेकर यांनी वकिलामार्फत महिला आयोगाच्या समोर ठेवला आहे.

तनुश्रीने मागील महिन्यात १० आॅक्टोबर रोजी तनुश्रीने नाना पाटेकर यांच्याविरोधात ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. परंतु, ओशिवारा पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आलेल्या या नव्या तक्रारीत आता विनयभंग उल्लेख केला आहे असंही नानांनी आयोगासमोर स्पष्ट केले. आता हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून तिथे प्रक्रिया सुरू असल्याची माहिती नानांनी दिली.

विशेष म्हणजे, नाना पाटेकरांविरोधात तनुश्री दत्ताने महिला आयोगाकडे धाव घेतली होती. तनुश्रीने महिला आयोगाकडे लेखी तक्रार केली आणि नाना पाटेकर आणि गणेश आचार्यविरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली होती.

महिला आयोगाने तनुश्रीच्या तक्रारीची दखल घेत नाना पाटेकर, गणेश आचार्य, निर्माता समीर सिद्दीकी, दिग्दर्शक राकेश सारंग यांना नोटीस बजावली होती. तसंच तनुश्रीलाही या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी आयोगासमोर स्वतः उपस्थित राहून आपले म्हणणे मांडावे असे निर्देश दिले होते. पण तनुश्रीने अद्याप कोणतीही माहिती दिली नाही.

मध्यंतरी नानांनी पत्रकार परिषद घेऊन तनुश्रीचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. मी दहा वर्षांपूर्वीही उत्तर दिलं होतं आणि आताही तेच सांगणार, जे खोटं आहे ते खोटचं आहे असं नानांनी सांगितलं होतं.

काय आहे प्रकरण

बाॅलिवूडचे अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर 'आशिक बनाया आपने' फेम अभिनेत्री तनुश्री दत्ताने 2008 साली विनयभंगाचे गंभीर आरोप केले होते. 2008 मध्ये 'हाॅर्न ओके प्लीज' या सिनेमाच्या सेटवर नाना पाटेकर यांनी माझ्यासोबत गैरव्यवहार केला होता. मी त्यांना विरोध केला. पण त्यांनी याचा बदला घेण्यासाठी संपूर्ण चित्रपटात मला त्रास दिला. नानांनी माझ्या एका गाण्यामध्ये मला त्रास देणारे आक्षेपार्ह सीनही ठेवले होते.

नाना एवढ्यावर थांबले नाही. तर त्यांनी माझ्या कुटुंबालाही त्रास दिला. शुटिंगच्या नंतर मी घरी निघाले तेव्हा त्यांनी गाडीवर दगडफेक केली होती असा आरोपही तनुश्रीने केला. तसंच मनसेच्या कार्यकर्त्यांकडून त्यांनी मला आणि माझ्या परिवाराला जीवे मारण्याची धमकी दिली असा आरोपही तनुश्रीने केला होता.

=====================

First published: November 16, 2018, 9:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading