मुंबई 6 मार्च: दाक्षिणात्य प्रेक्षक सिनेकलाकारांसाठी फारच भावूक असतात. आपल्या आवडत्या कलाकारांची ते अगदी एखाद्या देवाप्रमाणं पूजा करतात. त्यामुळं तिथं रजनिकांत, सुर्या, पवन कल्याण, एन.टी. रामाराव यांसारख्या अनेक नामांकित सिनेकलाकारांची मंदिर देखील आहेत. दरम्यान आपल्या आवडत्या कलाकारावरील प्रेम व्यक्त करणाऱ्या अशाच एका चाहत्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चाहत्यानं अभिनेत्याला भेटण्यासाठी चक्क नदीत उडी मारली. (fan jumps into canal)
नदीत उडी मारणारा तरुण दाक्षिणात्य सुपरस्टार नागा चैतन्यचा (Naga Chaitanya) चाहता आहे. नागा चैतन्य केरळमधील एका नदीत आपल्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण होता. त्यावेळी त्याला पाहण्यासाठी नदीच्या पुलावर प्रचंड गर्दी झाली होती. दरम्यान या गर्दीमधील एका तरुणानं नागा चैतन्यला भेटण्यासाठी थेट नदीत उडी मारली. अन् पोहत जाऊन तो अभिनेत्याला भेटला. या दृश्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Neekuna fanism ki avadhulu levu Anna @chay_akkineni
Ne cult fanism level veru anthe #ThankYouTheMovie#LoveStoryOnApril16th pic.twitter.com/ImJjKZ4HOj — Aarya Prasad (@Aaryaprasad) March 2, 2021
नागा चैतन्य हा प्रसिद्ध अभिनेते नागार्जून यांचा मुलगा आहे. वडिलांप्रमाणेच तो देखील आपल्या जबरदस्त अभिनयशैलीसाठी ओळखला जातो. 2009 साली जोश या चित्रपटातून त्यानं सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. त्यानंतर ये माया चेसावे, धडा, बेजवडा, मनम, महान्नती यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यानं काम केलं. त्याला प्रेमम या चित्रपटामुळं खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटात त्यानं साकारलेली विक्रम ही भूमिका प्रेक्षकांना इतकी आवडली की आज तो दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील नामांकित अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.