मुंबई, 10 मे : कोरोना व्हायरसनं सर्वांसमोरच वेगवेगळ्या समस्या निर्माण केल्या आहेत. या व्हायरसच्या संक्रमणामुळे सगळीकडेच लॉकडाऊन केलं आहे ज्याचा परिणाम उद्योग धंद्यांवर झाला आहे. याशिवाय मनोरंजन क्षेत्रावरही या लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. ज्यात सर्व मालिका आणि सिनेमांचं शूटिंग बंद पडलं आहे. त्यामुळे मेकर्ससोबत कलाकारांचही यात नुकसान झालं आहे. काम बंद झाल्यानं अनेक कलाकाराचे पैसे मिळालेले नाहीत आणि त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागत आहे. नुकत्याच एका मुलाखतीत एका अभिनेत्रीनं तिच्या सध्याच्या परिस्थितीविषयी सांगितलं.
सध्या टीव्हीवर अनेक मालिका रि-टेलिकास्ट केल्या जात आहेत. मात्र मालिकांची शूटिंग पूर्णपणे बंद करण्यात आलं आहे. पण यामुळे नागिन 4 ची अभिनेत्री सायंतनी घोषला सुद्धा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नुकत्याच टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं याविषयी सांगितलं. ती म्हणाली, लॉकडाऊनमुळे आम्हाला सुद्धा आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आम्ही सर्वजण घरी आहोत आणि आम्हालाही आता काम करावं असं वाटत आहे. काम सुरू होईल अशी अपेक्षा आहे पण हे सोपं नाही. सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न आहे आणि त्यातही सोशल डिस्टंसिंग सर्वात महत्त्वाचं आहे.
सायंतनीनं पुढे सांगितलं, सर्वांना सध्या पैशांची गरज आहे. पैसे द्यायला नकार दिलेला नाही पण ते देणार कसे. सर्व ऑफिस बंद आहेत. सर्वांनाच वेगवेगळ्या अडचणी आहेत. मलाही अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणाहून माझे पेमेंट येणं बाकी आहे. घर आणि कारचा इएमआय द्यायला माझ्याकडे पैसे नाही. सध्या सरकारनं इएमआयमध्ये सूट दिली असली तरीही घर तर चालवावं लागतंच ना? आता बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागत आहे.
सायंतनीचं म्हणणं आहे की, ज्या लोकांचं खरंच हातावरचं पोट आहे. जे रोजच्या हिशोबनं काम करतात त्यांच्याबद्दल ऐकल्यावर मला खूप दुःख होतं. ही वेळ सर्वांसाठीच खूप कठीण आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.