मुंबई, 11 सप्टेंबर : मुंबई पोलिसांसह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर एकेरी शब्दांमध्ये तोंडसुख घेणाऱ्या अभिनेत्री कंगना रणौत (kangana Ranaut) हिच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. अनधिकृत कार्यालयावर मुंबई महानगरपालिकेने हातोडा चालवल्यानंतर कंगना रणौत हिची पुन्हा डोकेदुखी वाढली आहे. कारण महाराष्ट्र सरकारच्या गृहमंत्रालयामार्फत कंगना आणि ड्रग्ज प्रकरणाचा तपास करण्याचा आदेश देण्यात आला. या आदेशाची प्रत आता मुंबई पोलिसांच्या हाती सोपवण्यात आली आहे.
ड्रग्ज प्रकरणामुळे अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिला अटक झाली असतानाच कंगनाचीही चौकशी होणार असल्याने या प्रकरणात पुढे नेमकं काय होतं, हे पाहावं लागेल.
अभिनेत्री सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासावरून कंगना रणौत हिने महाराष्ट्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. मुख्यमंत्र्यांविषयी बोलताना कंगनाचा तोल सुटल्याचंही पाहायला मिळालं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांचा तिने थेट एकेरी उल्लेख केला. यामुळे कंगना चर्चेत असतानाचा तिचं ड्रग्ज रॅकेटशी काही कनेक्शन आहे का, याची चौकशी होणार आहे.
सुशांतप्रकरणी ड्रग्ज अँगलच्या तपासात मोठा साक्षीदार सापडला
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्ज अँगलच्या तपासात नार्कोटिक्स विभागाला (NCB) मोठा साक्षीदार सापडला आहे. लॉकडाऊनमध्ये सुशांतच्या घरून रिया चक्रवर्तीचा घरी ड्रग्जचं कुरिअर पोहोचवणाऱ्या कुरिअर बॉयने या प्रकरणात अटकेत असलेल्या दीपेश सावंत आणि रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला त्याने ओळखलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनच्या कालावधीत एप्रिलमध्ये सुशांतच्या घरून रियाच्या घरी एक कुरिअर पाठवण्यात आलं होतं. दीपेश सावंतने हे कुरिअर दिलं होतं, ज्यामध्ये अर्धा किलो बड्स होते. लॉकडाऊनमध्ये चेकिंगदरम्यान बड्सचं पॅकेट पकडलं जाऊ नये, यासाठी कुरिअरमार्फत पॅकेट मागवण्यात आलं होतं, ज्यामध्ये घरातील काही सामानही ठेवण्यात आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.