मुंबई, 03 नोव्हेंबर: सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) आत्महत्या प्रकरणामध्ये आता वेगळाच ट्वीस्ट येण्याची शक्यता आहे. सुशांतच्या बहिणी मीतू सिंह आणि प्रियांका सिंह यांच्याविरुद्ध तक्रारीप्रमाणेच एफआयआर दाखल करण्यात आली आहे. रिया चक्रवर्ती (Rhea Chakraborty)ने सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच आधारे त्यांच्यावर एफआयआर दाखल केली आहे. असं प्रतिज्ञापत्र मुंबई हायकोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आलं आहे.
सुशांतच्या बहिणींविरोधात तक्रार आल्यामुळेच त्यांच्यावर एफआयआर दाखल केली. यामध्ये सुशांत किंवा त्याच्या कुटुंबियांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा कोणताही हेतू नव्हता असं स्पष्टीकरण मुंबई पोलिसांनी हायकोर्टात सादर केलं आहे. दरम्यान, सुशांतच्या बहिणींनी एफआयआर मागे घ्यावी अशी मागणी कोर्टात केली होती. ती मागणीही कोर्टाने फेटाळून लावावी अशी विनंती पोलिसांनी केली आहे. सीबीआय (CBI)या प्रकरणाचा आधीपासूनच तपास करत होती. त्यामुळे मुंबई पोलिसांनी एफआयआर दाखल करण्याची गरज नव्हती असं स्पष्टीकरण सीबीआयकडून देण्यात आलं आहे. याप्रकरणी न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठापुढे बुधवार 03 नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
सुशांतच्या बहिणींवर कोणता आरोप?
रियाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये सुशांतच्या बहिणींवर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीने तक्रार केली आहे की, सुशांतच्या बहिणीने दिल्लीच्या एका डॉक्टरकडून बोगस प्रिस्क्रिप्शन सुशांतसाठी पाठवलं होतं. सुशांतच्या मन:शांतीसाठी ही औषधं पाठवली आहेत अशी बतावणी करुन काही औषधं पाठवण्यात आली होती. पण या औषधांमुळे सुशांतची मानसिक अवस्था बिघडली असा आरोप रियाने केला आहे. ही औषधं घेतल्यामुळेच सुशांतने आत्महत्या केली असावी असा संशय रियाने दाखल केलेल्या तक्रारीमध्ये केला आहे. मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये याचा उल्लेख आहे.